Breaking News

ऋषभ पंतसाठी धोक्याची घंटा!

निवड समिती पर्यायांच्या शोधात

मुंबई : प्रतिनिधी

यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतील ढासळलेला फॉर्म हा गेल्या काही दिवसांमधला भारतीय संघासाठीचा चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी पंतला पसंती देणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर विंडीज दौर्‍यात पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली, मात्र फलंदाजीमध्ये त्याने पुरती निराशा केली. आफ्रिकेविरुद्ध दुसर्‍या सामन्यातही तो चुकीचा फटका खेळून लवकर माघारी परतला. पंतची ही कामगिरी पाहता निवड समितीने पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी इंडियन एका वृत्तपत्राशी बोलत असताना ही माहिती दिली.

ऋषभ पंतवर अतिक्रिकेटमुळे ताण येतोय का हे आम्ही पाहतोय. साहजिकच आम्ही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये (वन-डे, टी-20 आणि कसोटी) पंतसाठी पर्याय तयार करतो आहोत. के.एस.भारत, इशान किशन, संजू सॅमसन हे खेळाडू स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांच्या कामगिरीवर आमचे लक्ष आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

पंतच्या खेळावर आमचा विश्वास आहे. 2019च्या विश्वचषकानंतर आम्ही त्याच्या प्रगतीकडे लक्ष देत आहोत. त्याला संधी देत असताना थोडा संयम बाळगावा लागणार आहे. तो गुणवान खेळाडू आहे, असेही प्रसाद म्हणाले.

गेल्या काही दिवसांत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही ऋषभ पंतच्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात पंत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply