Breaking News

प्रगल्भ व समर्थ नेतृत्व

एकाहून अधिकपक्षांचे बनलेले कडबोळे निश्चित ध्येयधोरणाने काम करणारे स्थिर सरकार देऊ शकत नाही हे आता सर्वसामान्यांनाही कळू लागले आहे. पूर्ण बहुमतातील सरकार कसे वेगाने आणि खंबीरपणे काम करू शकते त्याचा अनुभवही आपण सध्या केंद्रात घेतो आहोत. हे सारे अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रगतीशील जनतेने राज्यात स्थिर सरकार द्यावे हे मोदींचे आवाहन सार्थच आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत गुरूवारी नाशिक इथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षे महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले आहे याबद्दल त्यांचे कौतुक करीत राज्यात फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा स्थिर सरकार देण्याचे आवाहन मोदीजींनी यावेळी केले. पूर्ण बहुमत नसल्यास सरकारच्या कामकाजात किती आणि कसे अडथळे येतात हे देशाने अलीकडच्या इतिहासात केंद्रात पाहिलेच आहे. मधल्या काळात राजकीय अस्थिरतेमुळे क्षमता असूनही राज्य वेगाने प्रगती करू शकले नाही. निव्वळ मुंबईतील झगमगाटाला राज्याची प्रगती कसे समजता येईल? यापूर्वीच्या सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव, त्यांच्या कृतीशुन्यतेचा फटका राज्यातील ग्रामीण जनतेला अधिक बसला. मोदीजींनी याकडे लक्ष वेधत, गेल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात सलग पाच वर्षे केवळ दोनच जणांच्या नेतृत्वाखालील सरकार टिकले याचा उल्लेख केला. अशा तर्‍हेने पाच वर्षांचा कार्यकाळ महाराष्ट्रातील दोघाच मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला आहे. एक म्हणजे वसंतराव नाईक व दुसरे देवेंद्र फडणवीस. पूर्ण बहुमत नसतानाही फडणवीसांनी हे शक्य करून दाखवले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. फडणवीस यांचे सुसंस्कृत व प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, कुठल्याही आव्हानात्मक परिस्थितीला शांतपणे तोंड देण्याची वृत्ती, कुशाग्र बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरीचे कसब व अनेक वर्षे विरोधी पक्षातून आक्रमकरित्या पार पाडलेली कामगिरी या सार्‍यातूनच गेली पाच वर्षे त्यांनी तारेवरची कसरत करीत मित्रपक्षांना सोबत घेऊन राज्याला प्रगतीच्या मार्गावर पुढे नेण्याचे काम केले आहे. सुरुवातीला ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासमोर आव्हाने काही कमी नव्हती. परंतु प्रशासन व राज्यकारभारावरची त्यांची पकड इतकी खंबीर आहे की अल्पकाळातच त्यांनी असले गौण मुद्दे गुंडाळून ठेवण्यास विरोधकांना भाग पाडले. अर्थात स्वत: फडणवीस यांनी सभेत उल्लेख केल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या सोशल इंजिनीअरिंगमध्ये न बसणार्‍या फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची संधी मोदी यांनी दिली. ही मोदींची दूरदृष्टी म्हटले पाहिजे. फडणवीसांच्या काळात मराठा आरक्षण प्रत्यक्षात आले. ओबीसी समाजासाठी वेगळा विभाग स्थापन केला गेला. धनगर समाजाला 1 हजार कोटींचे पॅकेज देण्यात आले आदींचा उल्लेख भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सभेत केला, तो सरकारचा कामाचा झपाटा अधोरेखित करणारा आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडेही या कार्यकाळात फडणवीस यांच्या सरकारने अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत राज्यातील ग्रामीण भागात भाजपला भरघोस पाठिंबा लाभला आणि विरोधकांचा हिरमोड झाला. राज्यातील भाजप सरकारला समर्थ नेतृत्व देणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा स्थिर आणि प्रगतीशील सरकार स्थापण्याची संधी महाराष्ट्रातील सुजाण जनता निश्चितच देईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply