डॉक्टरांची वानवा, सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय हेळसांड
जेएनपीटी : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या सुविधांचा अभाव, डॉक्टर वर्गाची वानवा, तसेच परिचारिकांची व कर्मचारी वर्गाची रिक्त पदे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांची हेळसांड होत आहे. उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे. अशा वाढत्या विकासामुळे येथील नागरीकरणही तेवढ्या प्रमाणात वाढत आहे. कोप्रोली परिसरातील नागरिकांना उद्भवणार्या आजारांवर उपचार करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणारे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्राच्या नव्या इमारत बांधकामासाठी व बांधकामानंतर तकलादू ठरलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी खर्च करण्यात येत आहे, परंतु रुग्णालयात सुविधांचा अभाव, डॉक्टर्सबरोबर परिचारिका व कर्मचारी वर्गाची पदे रिक्त आहेत. याशिवाय रुग्णालयात पाण्याचा अभाव असल्याने येथे प्रसूतीसाठी येणार्या गरोदर महिलांची ससेहोलपट होते, तसेच रात्रपाळीसाठी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना रात्री-अपरात्री पुढील उपचासाठी पनवेल, वाशी, तसेच मुंबईकडे धाव घ्यावी लागते. त्यात रुग्णांचा, त्यांच्या नातेवाईकांचा पैसा व वेळ वाया जात आहे. रानसई या आदिवासी भागातील रमीबाई वाघमारे यांनी सांगितले की, आम्ही आदिवासी बांधव उद्भवणार्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी जवळ जवळ 15 किमीचे अंतर ऊन-पावसात, रात्री- अपरात्री डोंगर, माळरान परिसरातून चालत कोप्रोली रुग्णालयात येत असतो, परंतु या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने व सुविधा नसल्याने उपचाराअभावी परत जावे लागते. त्यात रुग्णावर उपचार वेळेवर न झाल्याने रुग्ण दगावण्याचा धोका संभवतो. या रुग्णालयात डॉक्टर, तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल वारंवार बंद असल्याचे समजते.