बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतावर नऊ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले. तीन टी-20 सामन्यांची ही मालिका अखेरीस 1-1 अशा बरोबरीत सुटली आहे. भारताने विजयासाठी दिलेले 135 धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले.
डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला दणक्यात सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत दोन्ही फलंदाजांनी चिन्नास्वामी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. विशेषकरून डी-कॉकने भारतीय गोलंदाजांवर कडवा प्रहार केला. हेंड्रिग्ज 28 धावांवर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर डी-कॉकने बावुमाच्या साथीने आफ्रिकेच्या डावाला गळती लागणार नाही याची काळजी घेत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कर्णधाराने नाबाद 79 धावांची खेळी केली.
त्याआधी मोहालीच्या मैदानात आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करणारे भारतीय फलंदाज बंगळुरुच्या मैदानात पुरते अपयशी ठरले. ब्युरेन हेंड्रिग्ज, बिजॉर्न फोर्टेन यांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारताला 134 धावांवर रोखण्यात आफ्रिकेने यश मिळवले. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी त्याचा हा निर्णय पुरता चुकीचा ठरवला. विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून सर्व बाजूंनी संघ तयार हवा यासाठी विविध प्रयोग करीत असल्याचे कोहलीने नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केले होते.
सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली, मात्र रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. दुसर्या बाजूने शिखर धवनने संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत धवनने 25 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 36 धावा केल्या, मात्र तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर शिखर उंच
फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीलाही खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी बराच वेळ लागला. अखेरीस रबाडाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न करताना विराट सीमारेषेवर फेलुक्वायोकडे झेल देत माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि ऋषभ पंत यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र फोर्टेनने एकाच षटकात दोघांचा बळी घेत भारताला बॅकफूटवर
ढकलले. सरतेशेवटी रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करीत भारताला 134 धावांचा टप्पा गाठून दिला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने तीन, फोर्टेन व ब्युरेन हेंड्रिग्ज यांनी प्रत्येकी दोन, तर तबरेज शम्सीने एक बळी टिपला.