पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेला अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचा कट्टा म्हणजे त्यांचे विरंगुळा केंद्रच पण सामाजिक आणि वैयक्तिकसमस्या सोडवण्याचे हे ठिकाण आज कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शांत झाले. आता रस्त्यावरील बेघरांचे आश्रय स्थान बनलेले दिसते.
अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे हे रोहा तालुक्यातील चणेरे येथील त्यांचा कामाचा उत्साह पाहण्यासारखा असतो. काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करताना त्यांच्यातील पूर्वीचा राजकारणी कार्यकर्ता लपून राहत नाही. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्यांमध्ये मूळचे कोकणासह, विदर्भ, जळगाव, सातारा, कोल्हापूरपासून बेंगलोर-मेंगलोर पर्यंतचे सदस्य आहेत. प्रत्येकाच्या भाषेत फरक आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे पण कट्ट्यावर आले की विचुंबे, उसर्ली व नवीन पनवेल मधील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये राहणारे हे सगळे नवीन पनवेलकर होतात. या संघात सुप्रसिध्द सिने कलावंत व लावणी नृत्यांगना माया जाधव ही आहेत
कोरोनामुळे हा कट्टा ओस पडला आहे. संध्याकाळी उशिरा कट्ट्यावर हजेरी लावणारे 86 वर्षाचे गोडांबें, संत तुकडोजी महाराजांचा पगडा असलेले तरूण गोपाळ धारपवार, साऊथवाले जॉर्ज, फौजी रवी पवार आले की त्यांच्या सोबत येणारी ’जेमी’, कट्ट्यावर आली की मदन नेरकरांना शोधणार दणदणीत बोलण्याचा आवाज ऐकू आला की प्रकाश कदम कट्ट्यावर आहेत सांगण्याची गरजच पडत नाही. मृदु आवाजात शांतपणे आपले म्हणणे सांगणारे दिनकर देशमुख. कोणताही कार्यक्रम प्रास्ताविकासाठी मगरे हवेच. सकाळ-संध्याकाळ हजर असणारे पण वेळेचे बंधन पाळणारे थुल, हिशेबाला चोख असणारे पण थोडेसे फटकळ खजिनदार धामणे या कट्ट्यावर आल्यावर सगळेच आपली सुख-दुखे विसरतात. पण कोरोनाने या सर्वांचा आनंद हिरावून घेतला आहे. आता फक्त मोबाइलवरून एकमेकांची चौकशी करीत असतात. त्यातच साहेबरावांच्या पत्नी निर्मलाताई यांचे सोमवारी रात्री निधन झाल्याची बातमी आली. सतत मोबाइल मध्ये असणार्या मेश्रामांच्या मोबाइलमध्ये डोकावून हसणारे वामन मूर्ति साहेबरावांना हे दुख पचवण्याची ताकद मिळो हीच सर्वांची प्रार्थना आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper