Breaking News

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पोलादपुरात वाहनांची झाडाझडती

दोन स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत -तहसीलदार दीप्ती देसाई

पोलादपूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग आणि महाबळेश्वर-वाई राज्यमार्गावर वाहनांची झाडाझडती घेऊन मतदारांना पैशांची अथवा वस्तुरूपी आमिष दाखविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात येणार असून शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ स्थिर सर्वेक्षण पथक 24 तास तैनात ठेवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार दीप्ती देसाई यांनी दिली. पोलादपूर येथे दोन स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत असून तेथे पथकप्रमुख मिलिंद वसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संतोष मिसाळ, विनायक चव्हाण, पोलीस हवालदार जयसिंग पवार, कॅमेरामन सलमान, सलीम बागवान, नितीन गुरव हे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत कार्यरत असतात, तर आर. डी. किरकिरे यांच्यासह मनोज जाधव, ग्रामसेवक एस. आर. तायडे, पोलीस हवालदार विजय चव्हाण, सतीश महाडीक व कॅमेरामन जमीर शेख हे वाहनांची तपासणी करणार्‍या पथकासोबत कार्यरत असतात. या दोन पथकांच्या वाहन तपासणीच्या नोंदींची पाहणी तहसीलदार दीप्ती देसाई करीत असून, त्यामुळे निवडणूक काळात पोलादपूरमध्ये सतर्कता आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात वॅगन कार (एमएच-43, बीएम-3774) या वाहनाची झडती घेताना सोनूकुमार राजनारायण पटेल या व्यक्तीकडून या स्थिर सर्वेक्षण पथकाने तब्बल तीन लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली होती.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply