Tuesday , February 7 2023

गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न

अलिबाग : प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न आले आहे. गणेशभक्त गुरुवारी (दि. 9) मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडीत अडकले.

गणेशभक्त कोकणात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी रायगड जिल्ह्यातील खारपाडा, नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर आणि माणगाव या ठिकाणी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळेही वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहे.

नागोठणे ते इंदापूर या पट्ट्यात गुरुवारी अत्यंत धिम्यागतीने वाहतुक सुरू होती. पाच ते सहा किलोमिटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक मालवाहतूक करणारे ट्रक, केमिकल वाहक टँकर्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होत होती.

पाली शहरामध्ये वाहनांची प्रचंड गर्दी

पाली : प्रतिनिधी

गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना गुरुवारी (दि. 9) मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण नाक्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी बहुसंख्य वाहने पालीमार्गे वळवली. त्यामुळे पाली शहरात वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पाली बाजारपेठेत गर्दी होत आहे. त्यात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहने पालीमार्गे वळवल्याने शहरात वाहनांची गर्दी झाली. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी महत्वाच्या नाक्यावर वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. वाहनांच्या योग्य पार्किंगबाबत पोलिसांकडून सातत्याने नागरिक व व्यापार्‍यांना आवाहन केले जात आहे. पोलीस व्हॅनची गस्त सुरू आहे. जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

-विजय तायडे, निरीक्षक, पाली पोलीस ठाणे, ता. सुधागड

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply