Breaking News

रायगडचा वजीर कोण?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू झाली आहे. रायगड जिल्हाही त्यास अपवाद उरलेला नाही. गेले वर्षभर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपापले शक्तीप्रदर्शन केल्याने राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. आता तो रणसंग्राम जसजसा समिप येऊ लागलाय तसतसे राजकारणही आणि राजकीय नेतेमंडळीही चांगलीच आक्रमक होऊ लागली आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा माजी मंत्री सुनील तटकरे यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे आता या वेळी कोण बाजी मारणार आणि रायगडचा राजकारणातील वजीर कोण असणार हे निश्चित होणार आहे.

अनंत गीतेंचा मार्ग सुकर

अनंत गीते हे तिसर्‍यांदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. 2009 मध्ये त्यांना शेकापने पाठिंबा दिला होता, तर 2014 मध्ये शिवसेना-भाजप अशी युती होती.आताही 2019 मध्ये भाजपची साथ गीतेंना मिळणार आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती झाल्याने गीतेंचा मार्ग एकप्रकारे सुकर झाला आहे. 2014 मध्ये रायगडात भाजपचे अस्तित्व अत्यल्प होते, पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात भाजपचे अस्तित्व वाढलेले आहे. विविध पक्षांची नेतेमंडळी भाजपत दाखल झाल्याने पक्षाची ताकदही वाढली आहे. त्यामुळे या वेळी शिवसेनेला भाजपला केवळ गृहित धरून चालणार नाही, तर सोबत घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांची टीम पक्षबांधणीत कमालीची व्यग्रही आहे. विकासकामांच्या माध्यमातून रायगडातील पक्ष मजबूत केला जात आहे. त्यामुळे लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक यामध्ये भाजपला शिवसेनेची साथ लाभली, तर जिल्ह्यातील प्रस्थापितांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गीते हे गेली पाच वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचाही लेखाजोखा या निवडणुकीत होणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नंबर 1चा पक्ष म्हणून शिवसेना यशस्वी ठरली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची साथ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या वेळीही गीतेंना निवडणूक तशी अवघड जाणार नाही. हे जरी खरे असले तरी प्रतिस्पर्धी धूर्त राजकारणी असल्याने जागते रहोच्या भूमिकेतच शिवसेनेला राहावे लागणार आहे. 2014 आणि 2019च्या निवडणुकीत जमीन अस्मानाचा फरक असणार आहे. या निवडणुकीत जिंकणारा रायगडचा वजीर ठरणार आहे. कारण या निवडणुकीतील जय, पराजयावरच रायगडचे पुढील राजकारण ठरणार आहे. आणखी सहा महिन्यांनी राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीत आपले अस्तित्व कायम ठेवायचे असेल, तर लोकसभेची निवडणूक जिंकणे हे शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादी, शेकापसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या सार्‍या घडामोडीत काँग्रेस कोणती भूमिका घेते यावरही जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

तटकरेंचा मार्ग खडतरच

रायगडमध्ये यंदाही शिवसेना-भाजप विरोधात राष्ट्रवादी-शेकाप अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी, शेकापच्या या महाआघाडीत जिल्ह्यातील काँग्रेस सहभागी झालेली नाही. त्यामुळे ते आपला पाठिंबा कुणाला देतात यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.काँग्रेसने राष्ट्रवादी, शेकापच्या महाआघाडीत सहभागी होण्यास स्पष्ट नकारच दर्शविलेला आहे. त्यावरून प्रचंड आरोप, प्रत्यारोपही काँग्रेसजनांकडून केले जात आहेत. अर्थात त्या आरोपांमध्ये तथ्यही आहे. कारण बॅरिस्टर अ. र. अंतुले यांच्या पश्चात जिल्ह्यातील काँग्रेस संपविण्याचा विडाच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनी उचलला आहे. काँग्रेसला गृहित धरून चालणे, गरज असेल तिथे चुचकारणे आणि गरज संपली की लाथाडणे असे प्रकार राष्ट्रवादी आणि शेकापच्या नेतृत्वाने केल्याने काँग्रेसजनांमध्ये कमालीचा असंतोष प्रकट झाला आहे. त्यामुळे या वेळी राष्ट्रवादी आणि शेकापला धडा शिकविण्याचाच निर्धार काँग्रेसने केल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडणूक म्हणावी तशी सोपी राहिलेली नाही. उलट ती आणखी क्लिष्ट होऊ लागली आहे. केारण राष्ट्रवादीने आम्हाला फसविले हे काँग्रेसजनांना मनोमन पटू लागले आहे. गेल्या महिन्यात काँग्रेसचा निर्धार मेळावा रायगडात ठिकठिकाणी झाला. त्या वेळी महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप, अलिबागचे माजी आमदार मधू ठाकूर आदींनी तर राष्ट्रवादी, शेकापसमवेत आघाडी करण्यास स्पष्ट नकार दर्शवित जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे तटकरेंना काँग्रेसला महाआघाडीत समाविष्ट करून घेण्यासाठी जंग जंग पछाडावे लागणार आहे. त्यातच पेणमध्ये माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत महाआघाडीला विरोध दर्शवित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे तेथील राजकीय समीकरणेही आता बदलणार आहेत. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी, शेकापला विरोध म्हणून काँग्रेस आणि शिवसेना, भाजपची वाढती जवळीक ही नव्या समीकरणांची नांदी म्हणूनही पाहिली जात आहे. कारण नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शेकापला पराभूत करण्यासाठी शिवसेनेसमवेत काँग्रेसने हातमिळवणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात प्रत्येक निवडणुकीचा संदर्भ वेगवेगळा असला, तरी बदलणारी राजकीय समीकरणे मात्र लोकसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते हे दाखविणारी आहेत हे निश्चित. आता घोडा मैदान समिप आले आहे. येत्या दोन महिन्यांत अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. सुनील तटकरे, जयंत पाटील ही मंडळी राजकारणात माहीर आहेत. त्यामुळे ते नेमकी कोणकोणती चाल खेळतात यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

-अतुल गुळवणी (9270925201)

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply