Tuesday , March 28 2023
Breaking News

मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी

स्वराज्य स्पोर्ट्स, जय हनुमान, राजमाता जिजाऊ, शिवशक्ती यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत महिला विभागात विजयी सलामी दिली. डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सला मात्र आज संमिश्र यश लाभले. न्यू इंडिया इन्श्युरन्स, देना बँक, महिंद्रा, मुंबई बंदर, युनियन बँक यांनी पुरुषांत आगेकूच केली. या वेळी विभागीय आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर आजपासून सुरू झालेल्या महिलांच्या ब गटात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टसने ठाण्याच्या होतकरू मंडळाला 35-20असे पराभूत केले. अंजली रोकडे, श्रृतिका घाडीगावकर, सिद्धी ठाकूर यांच्या चतुरस्त्र खेळाने पहिल्या डावात 23-08 अशी आघाडी घेणार्‍या स्वराज्यला दुसर्‍या डावात मात्र कडवी लढत दिली, पण पहिल्या डावातील आघाडी मात्र होतकरूला कमी करता आली नाही. होतकरूच्या शर्वरी शेलटकर, भाग्यश्री पारकर जेमतेम खेळल्या. याच गटात शिवशक्ती मंडळाने देखील होतकरूला 37-07 असे लोळविले. या पराभवाने होतकरूला साखळीतच गारद व्हावे लागले. सोनाली शिंगटे, ऋतुजा बांदिवडेकर, प्रियंका कदम यांचा खेळ शिवशक्तीच्या या विजयात महत्त्वाचा ठरला. ड गटात कोल्हापूर बाचणीच्या जय हनुमान मंडळाने डॉ. शिरोडकर या मुंबईतील बलाढ्य संघाला 39-29 असे पराभूत करीत खळबळ उडवून दिली. पूर्वार्धात पहिला लोण देत जय हनुमानने 19-11 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यातून शेवटपर्यंत डॉ. शिरोडकरला सावरता आले नाही. आसावरी खोचरे, मृणाल टोपणे, पूजा पाटील यांच्या झंजावाती खेळाच्या जोरावर जय हनुमानने हा विजय मिळविला. शेवटच्या काही मिनिटांत शिरोडकरच्या क्षितिजा हिरवे, मेघा कदम यांनी जोरदार आक्रमण करीत सामन्यात रंगत आणली, पण संघाला विजयी करण्यास त्या अपयशी ठरल्या. नंतर झालेल्या सामन्यात डॉ. शिरोडकरने उपनगरच्या संघर्षला 37-24 असे नमवित बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. क्षितिजा हिरवे, मेघा कदम, साक्षी पवार या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. संघर्ष मंडळाकडून प्रणाली नागदेवते, पूजा जाधव छान खेळल्या. क गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊने ठाण्याच्या शिवतेजला 49-10असे धुऊन काढले. नेहा घाडगे, स्नेहल शिंदे, मानसी सावंत, पूनम तांबे यांच्या तुफानी खेळापुढे शिवतेजची डाळ शिजली नाही.

पुरुषांच्या अ गटात न्यू इंडिया इन्श्युरन्सने बँक ऑफ इंडिया या बलाढ्य संघाला 38-19 असे नमवित आगेकूच केली. मध्यांतराला 17-11 अशी आघाडी घेणार्‍या न्यू इंडियाने उत्तरार्धात आपल्या आक्रमणाची धार आणखी तेज करीत हा विजय सोपा केला. कुलदीप माईणकर, सुनील यादव, नीलेश पवार, विनोद येरूणकार यांच्या चौफेर खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बँकेचे सुदेश कुल्ये, अक्षय सोनी बरे खेळले. याच गटात महिंद्राने देखील बँक ऑफ इंडियाला 15-10 असे नमविल्यामुळे बँकेचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. क गटात देना बँकेने यजमान मुंबई महानगर पालिकेचा 31-10 असा पाडाव केला. अनिकेत चिकणे, सिद्धार्थ बोरकर, शुभम धनावडे बँकेकडून, तर संदेश सनगरे, मयूर मोहिते पालिकेकडून छान खेळले. याच गटात युनियन बँकेने देखील मुंबई महानगर पालिकेला 28-08 असे नमविल्यामुळे यजमानांचे आव्हान साखळीतच संपले. ब गटात मुंबई बंदरने सेंट्रल बँकेवर 48-17 अशी मात करीत आगेकूच केली. मुंबई बंदर संघाच्या या विजयात स्मिथिल पाटील, अरविंद देशमुख, शुभम कुंभार, किरण मगर चमकले. या पराभवामुळे बँकेचे बाद फेरी गाठण्याचे आव्हान खडतर बनले. कारण त्यांची पुढची लढत याच महिन्यात 4 अजिंक्यपद पटकाविणार्‍या एअर इंडिया यांच्याशी पडणार आहे.ही लढत त्यांच्यासाठी मरू किंवा मारू अशीच आहे.

Check Also

जलतरणपटू प्रभात कोळीचा भीमपराक्रम

न्यूझीलंडची कूक स्ट्राईट खाडी पोहून केली पार सात आव्हाने पूर्ण करणारा ठरला सर्वांत युवा स्विमर पनवेल …

Leave a Reply