नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 125 जागांची यादी मंगळवारी (दि. 1) जाहीर केली. भाजप नेते अरुण सिंह यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यात 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून, पहिल्या यादीत 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम, तर
महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सिडको अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव पहिल्याच यादीत झळकले असून, माजी मंत्री रविशेठ पाटील (पेण) यांचीही उमेदवारी जाहीर झाली. यासह आमदार मंदा म्हात्रे (बेलापूर) व माजी आमदार संदीप नाईक (ऐरोली) यांच्या नावांची घोषणा झाली.
भाजपचे जाहीर झालेले विभागनिहाय उमेदवार
विदर्भ : 38
मुंबई, ठाणे : 20
पश्चिम महाराष्ट्र : 37
उत्तर महाराष्ट्र : 11
मराठवाडा : 17
कोकण : 02
एकूण : 125
52 : विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
12 : महिलांना उमेदवारी
(संपूर्ण यादी पान 2 वर..)
-शिवसेनेचीही पहिली यादी घोषित; 70 जणांना तिकीट
मुंबई : भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, बीडमधून जयदत्त क्षीरसागर आणि नालासोपार्यातून चकमकफेम प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येत होते. मंगळवारी आदित्य ठाकरे यांना पक्षाने एबी फॉर्म दिला असून, ते 3 ऑक्टोबर रोजी वरळीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (संपूर्ण यादी पान 2 वर..)
– मनसेच्या यादीत नांदगावकर, सरदेसाईंना डच्चू
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेने 27 जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे, मात्र माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
– युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला भाजपच्या यादीसोबतच भाजप, शिवसेना युतीचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना 124 जागांवर लढणार आहे, तसेच शिवसेनेला विधान परिषदेच्या दोन अधिकच्या जागा दिल्या जातील. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्ष 164 जागांवर लढणार आहेत. भाजप आपल्या कोट्यातून घटक पक्षांसाठी 18 जागा सोडण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती झाल्याचे संयुक्त पत्रक सोमवारी माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.