पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या पाच वर्षांत जे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले तेवढेही काम शेकापने गेल्या 50 वर्षांत केलेले नाही. केवळ विरोधाला विरोध करून पनवेलला जागतिक नकाशावर नेण्याऐवजी पडद्यामागे ढकलण्याचे उद्योग करणार्या शेकाप नेत्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कामानेच सणसणीत चपराक लगावून पनवेलचे नाव जागतिक नकाशावर नेण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत रायगडचे भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी विरोधकांना सणकावले आहे.
शेकापच्या कर्नाळा या दैनिकाच्या सोमवार 30 सप्टेंबरच्या अंकात आमदार प्रशांत ठाकूर अकार्यक्षम असल्याचा उल्लेख करणार्या शेकापच्या बगलबच्च्यांना सणसणीत टोला रायगड भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी लगावला आहे. हरेश केणी यांना बळीचा बकरा कोण आणि कसे बनवत आहे याची कल्पनाही पनवेलकरांना आहे, असेही देशमुख म्हणाले.
आमदारांच्या विरोधात उभे राहून पराभव पत्करणार्या बाळाराम पाटील यांनी अखेरीस शरद पवारांच्या मदतीने मागच्या दरवाजाने विधिमंडळात प्रवेश केला, मात्र बाळाराम पाटलांनी याचे उत्तर द्यावे की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याच शरद पवारांच्या नातवाला मावळ मतदारसंघातून किती लीड मिळवून दिला? जरा आत्मपरीक्षण करा आणि मगच आमदारांबद्दल बोलण्यासाठी टाळूला जीभ लावा, असेही वाय. टी. देशमुख म्हणाले.
ज्या नाट्यगृहात आपण कधीतरी कार्यक्रमाला गेला असाल ते
नाट्यगृह, ज्या उड्डाणपुलावरून बहुतेक नेहमीच जात असाल तो उड्डाणपूल, ज्या 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे नुकतेच दिमाखात उद्घाटन झाले ते उपजिल्हा रुग्णालय, ज्या भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही जातो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा अतिरिक्त न्यायालय, पनवेलच्या विकासाची अशी अनेक कामे झालीत, ज्याचा तुम्हाला सोयीस्कर विसर पडलेला दिसतोय, असे सांगून वाय. टी. देशमुख पुढे म्हणाले की, पनवेलचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सतत प्रयत्न केले. त्यानुसार अमृत योजना लागू झाली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
सिडकोचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ताबडतोब महापालिका हद्दीत 100 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकासकामे, आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना, ग्रामसडक योजना या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना नवसंजीवनी देण्याचे कामही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनीच सुरू होणार आहे. तुम्ही ज्या विभागात राहता तेथे मेट्रो सुरू होत आहे, ती आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यतत्परतेनेच हे पण ध्यानात घ्या, असे सुनावून वाय. टी. देशमुख म्हणाले की, पंचायत समिती आपल्या ताब्यात आहे, मग आजपर्यंत पंचायत समितीची इमारत का पूर्ण होऊ शकली नाही, याचे आपल्याला ठाम उत्तर देता येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कारण तुम्ही सोयीचे राजकारण करणारे आहात हे पनवेलकरच नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे.
विकासाला दिशा देण्याऐवजी शेकापने त्या विकासाची दशा करण्याचे काम चोख केले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे तुम्ही मारत असलेल्या विकासाच्या गप्पा फोलच असतात, हे सर्व जनतेला माहीत आहे. सातत्याने दोन वेळा पराभव झाल्याने तुमच्यात ती मानसिकताच नाही, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. शेकापला उमेदवार मिळत नाही म्हणून हरेश केणी यांना शेकापने बळीचा बकरा बनविला आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि सोशल मीडियानेही तुमची खिल्ली उडवली आहे, असाही षटकार जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी अखेरीस लगावला.