पनवेल ः रामप्रहर वृत्त
188 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सहाय्यक आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिमंडळ 2 हद्दीतील सर्वच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची करडी नजर ठेवली आहे. वेगवेगळ्या प्रकारे या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी गुरुवारी (दि. 3) दिली.
पनवेल विधानसभा निवडणूक शांततेने व मोकळ्या वातावरणात निर्भयतेने होण्यासाठी पोलीस यंत्रणा विशेष कामाला लागली आहे. त्याअंतर्गत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने पोलीस रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. परराज्यातून पनवेल परिसरात वास्तव्यास असलेले गुन्हेगार, जामिनावर सुटलेले गुन्हेगार, पॅरोलवर सुटलेले गुन्हेगार, सजा भोगून आलेले गुन्हेगार अशा गुन्हेगारांवर पोेलिसांची करडी नजर आहे. त्या प्रत्येकाचा शोध सुरू असून, सध्या ते काय करतात, कुठे राहतात याची माहिती गुप्त विभागाकडून घेण्यात येत आहे. त्याच पाठोपाठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप, हवालामार्फत पैसे फिरविणे, बेकायदेशीररीत्या देशी विदेशी मद्याचा साठा करणे, बेकायदा मद्याची वाहतूक करणे, गुटखेे, अमली पदार्थांची विक्री करणे, सेवन करणे आदी प्रकारचे गुन्हे करणार्या व्यक्तींविरोधातसुद्धा कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
दिवसरात्री नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून, कोणतीही व्यक्ती समाजविघातक काम करत असेल याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असल्यास त्यांनी न घाबरता जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा कंट्रोल कक्षाशी 100 नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.