कर्जत : बातमीदार
कर्जत विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. कर्जत विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल झालेल्या प्रमुख उमेदवारांत आमदार सुरेश लाड, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे महेंद्र थोरवे, वंचित आघाडीचे अक्रम खान यांच्यासह भाकप, बसपा या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांचे नावसाधर्म्य असलेला आणखी एक उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत होती. 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य अशा एकूण 17 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यात महेंद्र सदाशिव थोरवे (महायुती), अॅड. गोपाळ शेळके (भाकप), सुरेश लाड (राष्ट्रवादी आघाडी), सुरेश चिंतामण गायकवाड (बसपा), अक्रम मोहमद अस्लम खान (वंचित आघाडी), पुष्पा मंगेश म्हात्रे (भारत पीपल्स पार्टी), शरद लक्ष्मण लाड (राष्ट्रवादी) यांच्यासह किशोर शितोळे, रमेश शांताराम कदम, जैतू कान्हू पिरकड, निखिल रामचंद हरपुडे, नरेनभाई वासुदेव जाधव, प्रकाश शिवाजी महाडिक, मोहमद अस्लम खान, संजय गणपत अभंगे, यशवंत नामदेव मुळे, सुरेश तुकाराम लाड (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. यापूर्वी कर्जत विधानसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यांनी निवडणुकाही लढल्या होत्या. तोच प्रकार या निवडणुकीतदेखील रंगण्याची शक्यता आहे. कारण मुंबई विलेपार्ले येथील सुरेश तुकाराम लाड यांचा अर्ज दाखल असून ते उमेदवार असणार का, हे 7 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.