Breaking News

भगव्या जल्लोषात महेंद्र थोरवेंनी भरला उमेदवारी अर्ज

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी शुक्रवारी (दि. 4) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. थोरवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जातमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते दाखल झाले होते. या वेळी ढोलताशांचा गजर, भगवे, निळे झेंडे यांनी वातावरण फुलले होते. कर्जत मतदारसंघ हा गेली 10 वर्षे भगव्यापासून दूर आहे, मात्र या वेळी युतीतर्फे महेंद्र थोरवे यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केल्यापासून या मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याच उत्साहात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी महेंद्र थोरवे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केला. कर्जत तालुक्यातील पोसरी येथील सुरभी लॉन्स येथे शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते सकाळपासून जमले होते. तेथून निघाल्यानंतर कर्जत मार्केट यार्ड येथून जमलेल्या कर्जत, खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेले. सेनेच्या महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, पुंडलिक पाटील, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल डाळिंबकर, खोपोली नगरपालिकेचे गटनेते सुनील पाटील, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात रॅली काढली होती. 24 तारखेला महायुतीचे कार्यकर्ते कर्जत मतदारसंघावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, याचा मला विश्वास असल्याचे मत महेंद्र थोरवे यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply