Breaking News

पृथ्वी वादळात कोलकाता गारद

अहमदाबाद ः वृत्तसंस्था

सलामीवीर मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर आयपीएलच्या साखळी सामन्यात सात गडी राखून विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने 16.3 षटकांतच विजय साकारला. पृथ्वीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने शिवम मावीच्या पहिल्याच षटकाच सहा चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. या पराक्रमानंतर पृथ्वीने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत संघाला चौथ्या षटकाच्या आधीच अर्धशतकी पल्ला गाठून दिला. पहिल्या सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्लीने बिनबाद 67 धावा फलकावर लावल्या. यंदाच्या हंगामातील या पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा ठरल्या. आठव्या षटकात पृथ्वीने 18 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या हंगामातील हे वेगवान अर्धशतक ठरले. दुसर्‍या बाजूला असलेल्या शिखर धवनने संयमी फलंदाजी करीत कोलकाताला नामोहरम केले. शॉने धवनसह 10व्या षटकात दिल्लीचे शतक फलकावर लावले. 13 षटकात या दोघांनी 123 धावांची भागीदारी केली.

कोलकाताचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने 14व्या षटकात शिखर धवनला पायचित पकडले. धवनने चार चौकार आणि एका षटकारासह 46 धावांची खेळी केली. विजयासाठी नऊ धावांची आवश्यकता असताना कमिन्सने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीने 41 चेंडूंत तब्बल 11 चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी करीत 82 धावांची दमदार खेळी केली. पृथ्वीनंतर कमिन्सने ऋषभ पंतलाही (16) बाद करीत दिल्लीचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मार्कस स्टॉइनिसने 17व्या षटकात प्रसिध कृष्णाला चौकार मारत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. 25 धावांची  भागीदारी केल्यानंतर दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने नितीश राणाला वैयक्तिक 15 धावांवर बाद करीत कोलकाताला पहिला दणका दिला. त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या पॉवरप्लेपर्यंत 45 धावा केल्या. अर्धशतकी भागीदारीकडे कूच करीत असताना मार्कस स्टॉइनिसने 10व्या षटकात राहुल त्रिपाठीला (19) माघारी धाडले. राहुलनंतर आलेल्या कर्णधार ईऑन मॉर्गनला ललित यादवने भोपळाही फोडू दिला नाही. याच षटकात ललितने सुनील नरिनलाही शून्यावर माघारी धाडले. अवघ्या 10 धावांत कोलकाताने 3 गडी गमावले. मागील काही सामन्यात अपयशी ठरलेला शुबमन गिल या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता, मात्र आवेश खानने त्याला वैयक्तिक 43 धावांवर बाद केले. शुबमनने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनी कोलकाताला शंभरी गाठून दिली. कार्तिक (14) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर रसेलने शेवटच्या षटकात केलेल्या हाणामारीमुळे कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याने 27 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली. 20 षटकांत कोलकाताने सहा गडी गमावत 154 धावा फलकावर लावल्या होत्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply