मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा राज्यात होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली. त्याला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता खरी लढाई सुरू होणार असून, भाजपने प्रचाराचा ’मेगा प्लान’ तयार केला आहे. या प्रचारात भाजपचा हुकमी एक्का असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका असणार आहे. जोडीला पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हेही महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ नऊ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. 17 ऑक्टोबर रोजी सातारा आणि पुण्यात मोदींच्या सभा होणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणीही सभांचे नियोजन सुरू आहे. शहा यांच्या सभांच्या तारखा व ठिकाणे अद्याप निश्चित झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकमध्ये
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप व मित्रपक्षांनी जोरदार तयारी केली असताना दुसरीकडे ऐन रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत राहुलबाबा शनिवारी सायंकाळी नवी दिल्लीहून बँकॉकसाठी रवाना झाले. ते 10 ऑक्टोबरला दिल्लीत परतणार आहेत, पण ऐन निवडणुकीच्या काळात ते बँकॉकला का निघून गेले, या प्रश्नाचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. याबद्दल पक्षाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.