Breaking News

फुटणार प्रचाराचे नारळ

याच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे दसरा हा प्रामुख्याने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचा दिवस ठरणार आहे. गेल्या आठवडाभरात उमेदवारनिश्चिती झाल्याने दसर्‍याला बहुतेक मतदारसंघांमध्ये निरनिराळ्या लहानमोठ्या पक्षांचे उमेदवार आपापल्या प्रचाराचा आरंभ करतील हे निश्चित.

दसरा अर्थात विजयादशमी हा हिंदुंच्या प्रमुख सणांपैकी एक. वर्षभरातील तीन अत्यंत शुभ तिथींमध्येही दसर्‍याचा समावेश केला जातो. प्रभु रामाने याच दिवशी रावणाचा वध केला होता असे मानले जाते. तसेच दुर्गा देवीनेही नऊ रात्री व दहा दिवसांच्या युद्धांनंतर महिषासुरावर विजय मिळवला होता. पुराणातील या संदर्भांमुळेच दसरा हा दिवस असत्यावर सत्याने विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो. दसर्‍याच्या सुमारास शेतीची कामे आटोपली की नांगर बाजूला ठेवून सीमोल्लंघन करून पराक्रम गाजवण्यासाठी बाहेर पडायचे ही महाराष्ट्रातील परंपरा होती. भारतीय जनता पक्षाकडून पारंपरिक दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत बीड जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुभारंभाची सभा आज (मंगळवारी) बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची फौज यंदा तयार ठेवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान आदींचा या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदीजींच्या नऊ तर अमित शहा यांच्या 18 सभा राज्यभरात होणार आहेत. येत्या 16 तारखेला पंतप्रधान खारघर येथील प्रचारसभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ 17 तारखेला पुणे आणि सातारा येथे मोदीजींची सभा होईल तर अमित शहा यांच्या सभांचा भर प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रावर असणार आहे. शिवसेनेचा तर प्रतिवर्षी दसर्‍याला शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा रिवाजच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेकरिताही विशेष असून मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल. शिवसेनेच्या उमेदवारांकडून अर्थातच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या सभांना मोठी मागणी आहे. काँग्रेस पक्ष मात्र मतदानाची तारीख इतकी समीप येऊनही अद्यापही प्रचाराकरिता तितकासा सज्ज दिसत नाही. राहुल गांधी तर निवडणुकीदरम्यान बँकॉकचा दौरा करीत आहेत. वर्षानुवर्षांच्या रिवाजानुसार अर्थातच त्या पक्षाच्या उमेदवारांची मदार गांधी घराण्यातील स्टार प्रचारकांवर आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका यांच्या उपस्थितीकडे उमेदवारांचे डोळे लागलेले आहेत. अर्थातच अलीकडच्या कित्येक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार नियोजन व आयोजनाचा झपाटा इतर पक्षांची व त्यांच्या उमेदवारांची मति कुंठित करणारा ठरला आहे. तेच चित्र निश्चितपणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतही दिसेल.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply