मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने जाताना महाडच्या आधी तीन किमीवर डावीकडे असलेल्या डोंगरात कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. हीच ती गांधारपाले लेणी. संशोधकांसाठी ही पर्वणी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाकडे पाहायला हवे. या लेण्यांचा अजूनही वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास व्हायला हवा.
गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर पूर्वाभिमुखी लेणी आहेत. पायथ्यापासून साधारणपणे 50-60 मीटर उंचीवर ही लेणी आहेत. लेणी समूहात एकूण 28 लेणी आहेत व त्यात तीन चैत्य आणि 19 विहारे आहेत. पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणार्या पायर्या आहेत. या पायर्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोहचतो. पायर्या चढण्यासाठी 20-25 मिनिटे लागतात.
पायर्या चढून जात असताना पहिल्यांदा आपल्याला 28 क्रमांकाचे लेणे दिसते, पण आपल्याला जायचे आहे एक क्रमांकाच्या लेण्यात, जे आहे एकदम डावीकडे व दुसर्या स्तरावर. येथील लेण्यांना डावीकडून क्रमांक दिले असल्यामुळे एक क्रमांकाच्या लेण्यापासून आपली भटकंती सुरू करायची.
या ठिकाणी चैत्यगृह आणि विहार अशा पद्धतीचे हे लेणे आहे. लेण्याच्या दर्शनी भागात सहा स्तंभ आहेत. सहा स्तंभांपैकी फक्त एकच स्तंभ पूर्णपणे कोरलेला असून, बाकीचे पाच अर्धवट आहेत. लेण्याच्या समोर प्रांगण आहे. मुख्य दालन आणि स्तंभ यांच्यादरम्यान व्हरांडा, दीर्घिका आहे. दालनात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आणि उजेड येण्यासाठी दोन खिडक्यांची रचना केली आहे. मुख्य दालनात असलेल्या नऊ खोल्यांपैकी चार खोल्या डाव्या बाजूच्या भिंतीत, तर पाच खोल्या पाठीमागील भिंतीत कोरल्या आहेत. या भव्य दालनाच्या आतील बाजूला चारी बाजूंनी ओटा आहे. पाठीमागील भिंतीत असलेल्या विहारात मध्यभागी दगडावर भगवान बुद्धांची प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली आणि धम्मचक्रमुद्रेतील बुद्धमूर्ती कोरलेली आहे. मूर्तीची बरीच नासधूस झाली आहे. मूर्तीच्या आसनाखाली धर्मचक्र व हरणे आणि वरील बाजूला चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष दिसतात. ही मूर्ती ज्या प्रस्तरात कोरली आहे त्याच्या मागील बाजूस आसनस्थ बुद्धमूर्तीचा आराखडा दिसतो. मूर्ती खोदण्यापूर्वी तिचा आराखडा कोरण्याची पद्धत महाराष्ट्रातील कोणत्याही लेण्यात बघावयास मिळत नाही, तसेच प्रस्ताराच्या दोन्ही बाजूला वज्रपाणी आणि पद्मपाणी यांची ओबडधोबड शिल्प दिसून येतात.
हा प्रस्तर बहुधा स्तुपासाठी राखीव ठेवला असावा, परंतु काही कारणास्तव प्रस्तरावर स्तुपाऐवजी बुद्धमूर्ती कोरण्यात आल्या, पण ह्या मूर्तीचे खोदकाम आणि बाहेरील खांब अर्धवट का ठेवले, याचे उत्तर मिळत नाही.
या ठिकाणी विहारातील प्रस्तरावर कोरलेली आसनस्थ बुद्धमूर्ती आहे. या लेण्याचे खोदकाम अर्धवट आहे. प्रांगण, दोन दर्शनी खांब, व्हरांडा आणि खोली अशी लेण्याची रचना आहे. ओसरीच्या उजव्या बाजूच्या भिंतीत ओबडधोबड कोरलेला बाक असून खोलीच्या आतसुद्धा बाक कोरलेला आहे. लेण्याच्या उजवीकडील भिंतीत दगडी बाक कोरलेला आहे. दर्शनी भागात दोन खांब आणि खांबांच्या मागे दगडी ओटे आहेत. स्तंभ खाली चौकोनी आणि शीर्षस्थानी अष्टकोनी आहेत. ओसरीच्या उजवीकडील भिंतीत तळाशी छोटी पायरी असलेला बाक आहे. व्हरांड्याच्या भिंतींना गिलावा देण्यात आला आहे. खाली उतरत जाणार्या पायर्या अन्य लेण्यांकडे जातात. दर्शनी भागात दोन स्तंभ आणि अर्धस्तंभ असून त्यांची अवस्था फार वाईट आहे. व्हरांडा, दालन आणि खोली अशी या लेण्याची रचना आहे. खोलीच्या पाठीमागील भिंतीत बाक कोरलेला आहे. दालन हे खोलीपेक्षा मोठे असून दालनाच्या उजव्या बाजूच्या भिंतीत बाक कोरलेला आहे. व्हरांड्याच्या उजव्या भिंतीवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख कोरलेला आहे, पण अक्षरांची झीज झाल्यामुळे हा लेख वाचता येत नाही.
या लेण्याची रचना मंडपासारखी आहे. ओसरीच्या आत दालन आहे. दर्शनी भागात दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. स्तंभ तळाशी चौकोनी आणि वरती अष्टकोनी, तर अर्धस्तंभ चौकोनी असून त्यांच्यावर वाळूच्या घड्याळ्याच्या आकाराची नक्षी आहे. दालनाच्या आतील तिन्ही बाजूंना बाक आहे. या लेण्याची निर्मिती चौथ्या लेण्यानंतर झाली असावी असे लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवरून वाटते. डाव्या बाजूच्या भिंतीवर जास्त खोदकाम केले असते तर भिंत पडून हे लेणे चौथ्या लेण्यात समाविष्ट झाले असते. ही भिंत ओबडधोबड असण्याचे हे कारण असावे.
लेण्याच्या प्रांगणातील उजव्या भिंतीवर हा शिलालेख कोरलेला आहे. या लेखाची लिपी ब्राह्मी आणि भाषा प्राकृत आहे. या लेखात राजा, राजवंश आणि काळ याचा उल्लेख नाही. लेखाच्या उजव्या बाजूचा भाग खराब झाल्यामुळे लेख वाचताना अडचणी येतात. काही लेण्यांपेक्षा हे लेणे खालच्या थरावर आहे. याचे खोदकाम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. लेण्याजवळ दोन पाण्याच्या टाक्या असून त्यापैकी फक्त एकच टाकी व्यवस्थित कोरलेली आहे. एक लेणे सहाव्या लेण्याच्या पातळीत आहे. व्हरांडा आणि मागे खोली अशी या लेण्याची रचना आहे. व्हरांडा आणि खोलीत कोनाड्यासारखे खोदकाम केलेले ओटे, बाक आहेत. व्हरांड्याचा दर्शनी भाग कोसळला आहे.
या लेण्यातसुद्धा चैत्यगृह आणि विहार यांची एकत्रित निर्मिती केली आहे. दर्शनी भागात दोन उद्ध्वस्त खांब आणि दोन अर्धस्तंभ आहेत. दोन्ही अर्धस्तंभ चौकोनी आकाराचे आहेत. अर्धस्तंभावर वाळूच्या घड्याळ्याच्या आकाराची नक्षी कोरली आहे. स्तंभ नष्ट झालेले असल्यामुळे ते कशे होते हे सांगता येत नाही, पण स्तंभांच्या शीर्षाजवळ असणारा घट आणि त्याच्यावरील हर्मिका अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. लेण्याच्या अंतर्गत भागात डाव्या आणि उजव्या बाजूला दगडी बाक असलेल्या तीन-तीन खोल्या आहेत. पाठीमागील मध्यभागी असलेल्या खोलीत आता स्तूप नसला तरी स्तुपाची दगडी छत्रावली अजूनही छताशी आहे व तळाशी स्तुपाचा गोलाकारही दिसून येतो. खोलीतील स्तूप नैसर्गिकरीत्या नष्ट झाला की मुद्दाम नष्ट केला हे सांगता येत नाही. मध्यवर्ती खोलीच्या दोन्ही बाजूंना दगडी बाक असलेल्या लहान खोल्या आहेत. या लेण्याला व्हरांडा नसला तरी प्रांगण आहे.
उजव्या बाजूच्या भिंतीवर अर्धस्तंभाच्या बाजूला प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. अशी अनेक लेणी या ठिकाणी आहेत. ती पाहायची असतील तर या ठिकाणी भेट द्यायला हवी.
-महेश शिंदे, खबरबात