अलिबाग : प्रतिनिधी
रायगड पोलिसांच्या तत्परतेमुळे रोहा तालुक्यातील चिंचवली खोंडावाडी येथील आदिवासी कुटुंबातील सहा वर्षांच्या मुलाची नांदेड येथील कोळसाभट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका झाली. हा मुलगा दीड महिन्यानंतर आपल्या घरी आला आहे. चिंचवली खोंडावाडी येथील सुनील अप्पा जाधव, राहुल सुनील जाधव (वय 6), गुलाब वसंत पवार, वसंत पवार, संतोष भास्कर पवार व इतर आदिवासी कुटुंबे ऑक्टोबर 2020 मध्ये तमलूर (ता. देगलूर, जि. नांदेड) या गावी स्थलांतरित झाले होते. मोहन शिंदे (परभणी) यांनी कोळसाभट्टी कामाकरिता या सर्व लोकांना घेतले होते. मे 2021पर्यंत या सर्व लोकांनी कोळसा भट्टीवर काम केले. दरम्यान, मे 2021च्या पहिल्या आठवड्यात यातील एक 15 वर्षांची मुलगी पडली. तिला दवाखान्यात नेण्याकरिता सुनील जाधव याने मुकादमकडे पैशांची मागणी केली. त्याचा राग मनात धरून मुकादम कोळसा भट्टी मालक मोहन शिंदे याच्याकडे गेला. मोहन शिंदे आणि इतर सहा ते सात लोकांनी रात्री झोपडीत घुसून सुनीलला मारहाण केली. या भांडणाचा आवाज ऐकून गुलाब पवार, वसंत पवार, संतोष पवार हे आपल्या झोपडीतून बाहेर येताच त्यांनाही मोहन शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात गुलाब पवार हिच्या हाताला दुखापत झाली. 15 वर्षांची मुलगी आपल्या आजीला सोडवायला गेली असता मोहन शिंदे याने तिला मारहाण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. शिंदे याने त्यानंतर सुनील जाधव याच्या राहुल या सहा वर्षांच्या मुलाला हिसकावून घेतले आणि मुलाला घेऊन निघून गेला. त्यानंतर सुनील जाधव व 15 वर्षांची मुलगी देगलूर नांदेड येथून पायी प्रवास करून पुण्यातील चांदणी चौक येथे पोहचले. तेथून ट्रकने विळे येथे आले. तेथून चालत आपल्या घरी आले. सुनील जाधव याने 12 जून रोजी विळे येथे जाऊन सर्वहारा जन आंदोलन संघटनेकडे हा सर्व प्रकार सांगितला. संघटनेने त्याची तक्रार रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकरी सूर्यवंशी यांच्या आदेशाने कोलाड पोलीस ठाण्यात कोळसा भट्टी मालक मोहन शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व सुनील जाधव याचा मुलगा राहुल याची मोहन शिंदे याच्या ताब्यातून सुटका करून मुलाला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.