माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून जवळच असणार्या ढालघर फाट्यावर रविवारी (दि. 6) पहाटे पावणेचारच्या सुमारास तीन वाहनांची धडक झाली. अपघातात 35 जण जखमी झाले असून, यातील गंभीर दुखापत झालेल्या सात जणांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.
माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने चाललेल्या भरधाव कंटेनरने (एमएच 46-एआर 9459) समोरून येणार्या मिनीबसला (एमएच 08-ई 9261) धडक दिली. त्यामुळे ही मिनीबस जोरात पाठीमागे जाऊन दुसर्या मिनीबस (एम 43-एच 4941)वर आदळली.
या अपघातात प्रियंका कृष्णा वैसर (40), कृष्णा लक्ष्मण वैसर (55), प्रीती पांडुरंग रेमजे (40), अंजली अरविंद शिगवण (35), जगदिश दत्ताराम गोवळे (24), गजानन महादेव गोवळे (45), प्रथमेश प्रवीण खानविलकर (28) यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे एका मिनीबसचा चालक सचिन शंकर पवार (वय 30, रा. दिवा, ठाणे), दत्तात्रेय नारायण रेमजे (42), पांडुरंग नारायण रेमजे (50), अनुजा दत्ताराम रेमजे, सिद्घी दत्ताराम रेमजे (वय 18), सुरेश गंगाराम पवार (51), सुचिता सुरेश पवार (40), बबन नारायण रेमजे (44), वीणा वैभव नाचरे (40), बबन नारायण रेमजे (वय 41), वैशाली बबन रेमजे (42, सर्व रा. ओमसाई दापोली), कृष्णा कानू भांबिड (58), कविता कृष्णा भांबिड (48), अमर अशोक मुलुख (28, सर्व रा. चिखलगाव), भरत मांजरेकर (41, आलेगाव, ता. दापोली), माधुरी बर्जे (35, कोलथरे ता. दापोली), अजित भुरण (20, ओनोशी, ता. दापोली), कल्पेश शांताराम राणे (35, दापोली), दुसर्या मिनीबसचा चालक राजेंद्र गणपत नाचरे (50), सागर प्रकाश भांबिड (28, पंचनरी, दापोली), समीर रघुनाथ गोवळे (22), रोहित अनंत जाधव (24, सर्व रा. कोळघरे, ता. दापोली), अक्षता अशोक जाधव (28, उंबर्ले, ता. दापोली), सुवासिनी शंकर काष्टे (51), शंकर भिकू काष्टे (53, आधारी, ता. दापोली), मंगेश महादेव राणे (50, बुरोंडी, ता. दापोली) हे 28 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.