नवी मुंबई : प्रतिनिधी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात तथा उपाययोजना करण्या संदर्भात एपीएमसीमार्केटमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त राजेश कानडे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. तसेच या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व घटकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे एक लाख लसीच्या कुपींची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनादेखील त्यांनी एपीएमसी प्रशासनाला केली.
बाजार समितीचे प्रभारी सचिव संदीप देशमुख यांनी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला बाजार आवारातील किरकोळ विक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक रामगुडे, यांनी गर्दीचे नियोजन, वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करण्याबाबत सूचना केल्या. त्याचप्रमाणे एपीएमसीचे सभापती अशोक डक यांनी सर्व बाजार आवारामध्ये लसीकरण करणेसाठी शासनाकडे लसींची मागणी करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनास दिल्या.
कचर्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावणे व स्वच्छता गृहाची योग्यप्रकारे स्वच्छ ठेवण्याचे आदेश स्वच्छता विभागास देण्यात आले. तर बाजार समितीकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीकडून योग्य त्या उपाययोजना करत असल्याचे व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध घटकांचे लसीकरण करण्यासाठी लसींच्या कुप्या पुरविण्याबाबतचा प्रस्ताव शासनास त्वरीत सादर करण्यात येईल, असे सांगितले.
या सभेस बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, नवी मुंबई महारनगरपालिकेचे उपायुक्त राजेश कानडे, बाजार समितीचे प्रभारी सचिव एस. जे. देशमुख, संचालक अशोक वाळुज, संजय पानसरे, विजय भुता, निलेश वीरा तसेच बाजार समितीचे विविध विभागाचे अधिकारी, उपसचिव आणि स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.