Breaking News

माथेरानकरांचा रेल रोको स्थगित

कर्जत : बातमीदार

माथेरानची मिनीट्रेन बंद असून, ती सुरू करण्यासंदर्भात माथेरानकरांनी नेरळ येथे मेन लाइनवर सोमवारी (दि. 14) रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता, मात्र मध्य रेल्वेचे डीआरएम व खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची घोषणा येथील श्रीराम मंदिर येथे छोटेखानी सभा घेऊन करण्यात आली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना सोमवारी सकाळी डीआरएम यांच्या मुंबई कार्यालयात चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बंद असलेली नेरळ -माथेरान मिनीट्रेन सुरू करावी, या मागणीसाठी 14 ऑक्टोबरला रेल रोको आंदोलन करण्याकरिता माथेरानमधील सर्वपक्षीय नागरिकांनी कंबर कसली होती. याचे गांभीर्य ओळखून खासदार श्रीरंग बारणे यांनी माथेरानकरांची भेट घेऊन रेल रोको करू नका, असे आवाहन केले होते, तसेच मध्य रेल्वेचे डीआरएम संजीवकुमार जैन यांनी सोमवारी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात याबाबत सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित केले असल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले. सोमवारी सकाळी माथेरानकरांचे शिष्टमंडळ डीआरएम यांच्या कार्यालयात जाणार आहे. या सभेमध्ये रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखवली नाही आणि 20 ऑक्टोबरपर्यंत माथेरान-अमन लॉज शटलसेवा सुरू केली नाही, तर मात्र आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा इशाराही  देण्यात आला.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply