सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनंतरही वाहतूक सुरूच
महाड : प्रतिनिधी
ऐन पावसाळ्यात महाड -भोर-पुणे मार्गावर जागोजागी दरडी आणि मातीचा भराव आला आहे, तसेच वरंध आणि भोर हद्दीत काही ठिकाणी मार्ग खचला आहे. यामुळे हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून या खचलेल्या भागातून धोकादायक प्रवास केला जात आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत महाड-पुणे मार्गावर वरंध घाटातील रस्ता दीर्घकाळासाठी नादुरुस्त झाला. माझेरी गावाजवळ अर्ध्याहून अधिक रस्ता खचला गेला, तर रस्त्यात मोठे दगड आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग दीर्घकाळाकरिता बंद ठेवला आहे. वाघजाईजवळ रस्त्यात दगडाची तात्पुरती भिंत उभी केली आहे, मात्र काही शौकिनांनी दरीच्या बाजूकडील माती आणि दगड हटवून रस्ता वाहतुकीस सुरू केला आहे. रस्त्यात आलेल्या मोठ्या दगडाच्या बाजूने नाल्यात दगड टाकून वाहने बाजूने काढली जात आहेत. माझेरीजवळ ज्या ठिकाणी हा रस्ता अर्ध्याहून अधिक खचला गेला आहे, त्या ठिकाणीदेखील कोणतीच संरक्षण यंत्रणा उभी केलेली नसतानादेखील वाहने या ठिकाणाहून मार्गस्थ केली जात आहेत. यामुळे वाहने ये-जा होत असताना धोका निर्माण झाला आहे. महाडकडे येणार्या भाजीच्या गाड्यादेखील याच भागातून ये-जा करीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीत माझेरी, पारमाची ते वाघजाईपर्यंतचा मार्ग नादुरुस्त झाला. जागोजागच्या दरडी हटवण्याचे काम अद्याप सुरूच आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचून गेला आहे, त्या ठिकाणी कोणतीच सुरक्षित यंत्रणा प्रशासनाने उभी केली नाही. वाघजाईजवळ रस्त्यावर आलेली भलीमोठी दरड प्रशासनाने हटवली नसली तरी या दरडीच्या बाजूने नाल्यात दगड टाकून वाहतूक सुरू आहे.
सध्या घाटात दुरुस्तीचे काम सुरू होत आहे. घाटातील धोकादायक स्थिती पाहता हा मार्ग बंद केला आहे. वाहतूक सुरू न करण्याबाबत पोलीस प्रशासनाला कळवले आहे, मात्र वाहतूक सुरू असेल तर पोलिसांनी ती तत्काळ थांबवावी.
– बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड