आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापार्यांमध्ये नाराजी
अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी टाळेबंदी (लॉकडाऊन) चा कालावधी 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. असे असले तरी प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील व्यवहार सोमवार
(दि. 4)मेपासून सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट आदेश प्राप्त झाले नसल्याने जिल्ह्यातील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले.
रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित रायगड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. त्यामुळे किमान उर्वरित रायगडात सोमवारी दुकाने उघडली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत आदेश निघाला नसल्याने व्यापार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुकाने उघडली जातील म्हणून सकाळीच नागरिक बाजारपेठेत गेले होते, परंतु कोणती दुकान उघडायची हे आदेश दुकानदारांना मिळाले नव्हते. त्यामुळे व्यापार्यांकडून दुकाने उघडण्यात आली नाही.
वाइन शॉप बंदच; मद्यप्रेमींची निराशा
पनवेल : राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारूची दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून दारूपासून लांब राहिलेल्या तळीरामांनी सोमवारी (दि. 4) सकाळीच वाईन शॉप गाठले. राज्यात काही ठिकाणी दारु विक्रीही झाली, मात्र पनवेलसह रायगड जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने बंदच होेती. त्यामुळे जिल्ह्यात मद्यप्रेमींची निराशा झाली.
राज्यातील विविध भागांत तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर अक्षरश: रांगा लावल्या होत्या. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते, तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून लोकांना उभे राहण्यासाठी दुकानाबाहेर ठराविक अंतरावर गोल रिंगण करण्यात आले होते. या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. पनवेल परिसरातही मद्यप्रेमी रांग लावून उभे होते, मात्र दारुची दुकाने उघडण्यातच आली नाहीत. तरीही लोक हटत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करीत लोकांना फटके दिले.