हेल्मेट घालून केले दांडिया नृत्य
कर्जत : बातमीदार
दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले पाहिजे, असा संदेश देण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी हेल्मेट घालून दांडिया खेळत कोजागरी पौर्णिमा साजरी केली.
कर्जत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रास गरबा सादर केला. या वेळी त्यांनी चक्क हेल्मेट घालून दांडिया नृत्य केले. याच कार्यक्रमात महिलांनी ‘बेटी बचाओ’चे नारे देत दांडियावर ताल धरला. या वेळी एकाच रंगमंचावर बेटी बचाओ आणि हेल्मेट वापरा, असे नारे दिले गेले. कार्यक्रम यशस्वितेसाठी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. स्वप्नील पडते, डॉ. म्हात्रे, डॉ. पाटील, डॉ. माने यांच्यासह सदस्यांनी प्रयत्न केले.