Sunday , February 5 2023
Breaking News

गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान

नेरळजवळील विकटगड म्हणजे पेब किल्ल्यावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालेला किळसवाणा प्रकार लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी साम्राज्यातील गडकोट आता अनेक प्रकारांनी सतत चर्चेत राहिले आहेत. त्या गडकोटांचे संवर्धन राखण्याची कामे शासनाने आणि स्वयंसेवी संस्था यांनी सुरू केलेली आहेत, पण या सर्व गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान सर्वांत मोठे आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे. नेरळजवळ असलेल्या माथेरानच्या डोंगराला लागून असलेला पेब किल्ला हा तेथील विकटेश्वर या भगवान शंकराच्या स्वयंभू शिवलिंग यामुळे विकतगड या नावाने ओळखला जात आहे. त्यावेळी या किल्ल्याचे शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य कार्यकाळात असलेले महत्त्व आजही या किल्ल्यावर गेल्यावर आणि तेथून परिसराची निगराणी केल्यानंतर लक्षात येते. शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केल्यानंतर कल्याणमार्गे रायगडावर जाताना या किल्ल्यावर लुटीतील खजिना काही काळ सुरक्षित ठेवला होता, मात्र या किल्ल्यावर हा खजिना ठेवला आहे असे मोगलांच्या सैनिकांना समजताच मोगलांचे सैनिक या किल्ल्यासमोर नेरळजवळ उल्हास नदीच्या तीरावर तळ ठोकून राहिले होते. त्या वेळी या किल्ल्यांचे रक्षण करणार्‍या मावळ्यांनी किल्ल्यावरून केलेल्या तोफांच्या मार्‍यात मोगलांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यांच्या खाणाखुणा आजही त्या ठिकाणी असून त्यामुळे या किल्ल्याबाबत मुंबई पुण्यापासूनचे गडप्रेमी हे या किल्ल्यावर माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात, पण या गडकिल्ल्यावर पोहोचण्यास मागील 20 वर्षांपूर्वी सोपा असा रस्ता नव्हता. त्या वेळी माथेरान मिनीट्रेनवर मोटरमन असलेले राजाराम खडे यांनी गडावर पोहचण्यास तीन ठिकाणी लोखंडी शिड्या तयार केल्या आहेत. त्या लोखंडी शिड्यांमुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि ट्रेकर्स हे नंतरच्या काळात गडावर पोहचू शकले आहेत. त्यानंतर गडावर मोठ्या प्रमाणात पोहचू शकलेले पर्यटक हे या वेळी गडाचे पावित्र्य राखत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. राज्यातील अनेक गडांवर मद्यपान करणारे पर्यटक हे अनेक वेळा आढळून आले आहेत. त्याचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले असून त्यानंतर निर्माण झालेले वादळ हे काही काळानंतर शांत होते, मात्र गडकिल्ल्यांवरील पावित्र्य राखण्याचे आव्हान कायम

चर्चेचा विषय बनले आहे. गडकिल्ल्यांवर सापडत असलेल्या दारूच्या बाटल्या हा गंभीर प्रश्न असून शिवभक्त हे त्याबाबत प्रत्येक वेळी नाराजी व्यक्त करतात, मात्र गडकिल्ल्यांवर येणारे भाविक, पर्यटक, गडप्रेमी, ट्रेकर्स हे बाहेरच्या राज्यातील तर नक्कीच नसतात. मग त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत नसेल का? त्यांना इतिहास नक्कीच माहीत असणार, पण असे असतानादेखील मद्यपान करण्याची हिंमत त्यांच्याकडून कशी केली जाते, हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. हा प्रश्न पेब किल्ल्यावर नाही तर सर्व किल्ल्यांवर कमी अधिक प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे पेब किल्ल्यावरील या वर्षातील पहिल्या दिवशी झालेली घटना लक्षात घेता तो सर्व प्रकार किळसवाणा नक्कीच आहे. कारण मद्यपान करणे आणि ते सर्व साहित्य घेऊन जाणे हा प्रकार नक्कीच किळसवाणा आहे, पण त्यांच्यासोबत केलेले वर्तन हेदेखील तितकेच अशोभनीय आणि धिक्कार करण्यासारखे आहे. त्यातून गडकिल्ल्यांचे संवर्धन करीत असलेल्या संस्था यांच्या कार्यात काही अडथळे आणण्याचा प्रकार आहे, पण महाराजांच्या पवित्र अशा किल्ल्यांवर अशा प्रकारे पावित्र्य बिघडविण्याचे कामदेखील करण्याची हिंमत आपल्याच राज्यातील पर्यटक करणार असतील तर तेदेखील क्षम्य करावे अशी बाब नक्कीच नाही. कारण अनेक संस्था आणि सरकारदेखील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत असताना किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याची खरी जबाबदारी गडकिल्ल्यांच्या संवर्धनात पुढाकार घेणार्‍या संस्थांचे कार्यकर्ते

यांच्यापेक्षा कणकभर सरस आपलीच स्वतःची आहे. पेब किल्ल्यावर असलेल्या विकटेश्वराच्या मंदिरात फार कमी पर्यटक गडावर जाऊनदेखील पोहचत नाहीत, मात्र त्यातील असंख्य पर्यटक किल्ल्याच्या सर्व भागात फिरत असतात आणि त्यांचे आवडीचे ठिकाण असते ते म्हणजे गडावरील दगडात असलेले भुयार. त्या मोठ्या घळीत 200 माणसे आरामात बसून कोणाचे मार्गदर्शन ऐकू शकतात अशी ती प्रशस्त जागा आहे, पण त्याच जागेत काही लोक जुगार खेळतानादेखील दिसून येत असते. त्याचवेळी या किल्ल्यावर रात्रीच्या अंधारात प्राणी मारण्याचे काम करणारी काही मंडळीदेखील आहेत. मग या दोन्ही प्रकारांनीदेखील गडाचे पावित्र्य नष्ट होताना दिसून येत आहे, मात्र हे प्रकार प्रामुख्याने स्थानिक करताना दिसत असताना त्यांना रोखण्याचे काम गडप्रेमी करताना दिसत नाहीत याचादेखील विचार प्राधान्याने करण्याची गरज आहे, पण किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांना ट्रेकर्स आणि गडप्रेमी यांच्याकडून कशा प्रकारे पावित्र्य राखले जाणार याचादेखील विचार करण्याची गरज आहे.

पेब किल्ल्यावर दारूचे पेग रिचवले जात असतात. याच कर्जत तालुक्यातील कोथळीगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिमान वाटावा असा सोहळा होत होता. त्या ठिकाणी कोथळीगडावर गडाला पुन्हा नवीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी तब्ब्ल 400 किलो वजनाचा सागवान दरवाजा बसविण्याचे काम होत होते. त्या ठिकाणी हजारो शिवभक्त तेथे पोहचले होते आणि तेथे ते हर हर महादेवचा गजर करीत होते, तर पेब किल्ल्यावर उच्चशिक्षित तरुण गांजा, मद्यपान हातात घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा प्रकार सुरू होता. हे सर्व कर्जत तालुक्यात होत असताना आता अनेक गडकिल्ल्यांवर येथील पावित्र्य राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply