उरण : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील डॅशिंग अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना भरघोस मताधिक्याने विजयी करून उरणकरांचे नेतृत्व विधानसभेत करण्यासाठी आगरी, कोळी, कराडी, मुस्लिम समाजासह इतर जाती धर्माच्या महिला सज्ज झाल्याचे मत रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केले.
रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांशी उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात संवाद साधला. त्या म्हणाल्या की, महेश बालदी हे कर्तृत्ववान नेते असून त्यांचा मागील 2014च्या निवडणुकीत पराभव झाला, तरी त्या पराभवात खचून न जाता त्यांनी उरण मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत कोणत्याही प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या मागे जनता जनार्दनाचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तसेच आदिवासी वाड्यांबरोबर, महिलांच्या, विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावरून सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज सुज्ञ जनता विशेष करून आदिवासी बांधवांनी, महिलांनी, तरुणांनी त्यांना विकासाचा महामेरू म्हणूनच संबोधले आहे, परंतु ज्यांना जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वेळ मिळत नाही ते स्वतःच्या
पक्षातील पदाधिकार्यांची महिलांच्या पडद्याआडून बदमानीचा धिंडोरा पिटत व त्यांचे जिल्हाप्रमुख पद आपल्या पदरात पाडून घेण्यात धन्यता मानतात, हे उरणच्या सुज्ञ मतदारांना माहीत आहे. आणि तेच नेते उरणच्या विकासासंदर्भात चर्चा न करता महेश बालदी यांची बदनामी करण्याचा घाट घालत असतील, तर हुतात्म्यांच्या पावन भूमीत ते योग्य नाही.
अशा सत्तेसाठी, पदासाठी हपापलेल्या स्वार्थी नेत्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून घरी पाठविण्यासाठी व उरणच्या विकासासाठी महेश बालदी यांना विजयी करण्यासाठी आता आगरी, कोळी, कराडी, मुस्लिम समाजासह इतर समाजाच्या महिला सज्ज झाल्या आहेत, असे शेवटी रेश्मा नंदकुमार कडू यांनी नमूद केले आहे.