आय रन इंडिया मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
मोहोपाडा ः वार्ताहर
अॅक्सिओम स्पोर्ट्स अॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत राज्यस्तरीय आय रन फॉर इंडिया मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात रायगड व नवी मुंबईतील स्पर्धकांची संख्या लक्षणीय होती. ही स्पर्धा चार वयोगटात घेण्यात आली.
या वेळी भाग घेतलेल्या स्पर्धकांना ड्राय फिट टी-शर्ट देण्यात आले, तर 21 किमी व 10 किमी धावणार्या स्पर्धकांना स्पोर्टस जॅकेट देण्यात आले. ही मॅरेथॉन स्पर्धा इनॉर्बिट मॉल येथून सुरू होऊन पामबीचमार्गे पुन्हा त्याच जागी सांगता करण्यात आली. रस्त्यावरील वाहतुकीस व पादचार्यांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी जागोजागी स्वयंसेवक नेमून सुसज्ज रुग्णवाहिका अॅक्सिओम स्पोर्ट्स अॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने ठेवण्यात आली होती. प्लास्टिकमुक्त परिसर करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा 21 किमी, 10 किमी, 5 किमी व 3 किमी वयोगटात घेण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान, तसेच नीट इंडियाच्या माध्यमातून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रन फॉर इंडिया मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मॅरेथॉन स्पर्धकांनी धाव ठोकून स्वच्छतेचा संदेश दिला. या वेळी विविध वयोगटातील विजेत्यांना एकूण 35 पारितोषिके प्रदान करण्यात आली. सन्मानचिन्ह, गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. स्वच्छतेचा संदेश देत प्लास्टिक मुक्तीसाठी उपस्थितांनी शपथ घेतली. पारितोषिक समारंभ प्रसंगी अनिल बक्षी, राजेश सिंग, अमित यादव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.