Breaking News

जिल्ह्यात उत्स्फूर्त मतदान

कर्जतमध्ये सखी मतदान केंद्रावर गर्दी; महिलांकडून सेल्फी

कर्जत : बातमीदार

कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांतपणे मतदान झाले. शहरातील शारदा मंदिर शाळेत उभारण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांची मोठी गर्दी झाली होती. अनेक महिला मतदार येथे सेल्फी काढण्यात मग्न झाल्या होत्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक विभागाकडून काही मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट बनविण्यात आले होते. कर्जत शहरातील शारदा मंदिर शाळेत असलेल्या 171 क्रमांकाच्या मतदान केंद्राचे रूपांतर सखी मतदान केंद्रात करण्यात आले होते. या केंद्रातील सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी या महिला होत्या. सुरक्षेवरदेखील महिला कर्मचारी तैनात करण्यात आल्या होत्या. केंद्र अध्यक्ष म्हणून अरुणा गंगावणे, तर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रात नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांत प्रतिभा साळोखे, भाग्यश्री बोरसे, शीतल पुरी, ज्योती सरगर यांचा समावेश होता. सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या होत्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या सखी मतदान केंद्राला बाहेर सुशोभित करून त्या ठिकाणी एक सेल्फी पॉइंटही बनविण्यात आला होता. त्या पॉइंटवर महिला मतदारांनी मतदान केल्यानंतर आपले फोटो काढावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. सखी केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या बहुसंख्य महिला मतदारांनी येथे सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतली. या मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी या सखी मतदान केंद्राला भेट देऊन लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या महिला मतदारांचे कौतुक केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply