Breaking News

मतदान झाले; आता प्रतीक्षा निकालाची

मुंबई : प्रतिनिधी

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) उत्साहात मतदान झाले. राज्यातील अनेक भागांत कोसळणार्‍या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांबरोबरच एकूण 3,237 उमेदवारांचे भविष्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. आता सर्व उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी निकाल असल्याने दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले. राज्यात आठ कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने कमालीची सज्जता ठेवली होती. त्याचबरोबर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानासाठी राज्यात 95,473 मुख्य, तर 1,188 सहाय्यक अशी एकूण 96 हजार 661 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. चार कोटी 68 लाख 75 हजार, 750 पुरुष, तर चार कोटी 28 लाख 43 हजार 635 महिला असे एकूण आठ कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार राज्यात आहेत. या वेळी दोन हजार 634 तृतीयपंथी, तीन लाख 96 हजार अपंग आणि एक लाख 17 हजार 581 सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply