17 लाख 27 हजारांचा माल हस्तगत
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
केरळमधील कालपेट्टा येथून 17 लाख 27 हजारांचे मोबाइल पळवून नेपाळला जाणार्या आरोपींना पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या गुप्तचरांनी मंगला एक्सप्रेसमधून भुसावळपर्यंत पाठलाग करून गुरुवारी आरोपींना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला. सादर आरोपींना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्या सुरक्षा अधिकार्यांना गुरुवारी केरळमधील कालपेट्टा येथील मोबाइलचे दुकान फोडून आरोपी मंगला एक्सप्रेस मधून दिल्लीला जात असल्याची माहिती केरळच्या पोलिसांनी दिली. त्या आरोपींचे फोटोही देण्यात आले होते. पनवेल सुरक्षा बलाचे निरीक्षक जसबीर राणा यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी रेल्वे गुप्तचर शाखेचे निरीक्षक राघव यांच्यासह उप निरीक्षक अनवर शाह, हवालदार विनोद राठोड, संतोष पटेल, मुकेश दुगाने, विजय पाटील, ललित वर्मा, शिपाई शिवाजी मुंढे, निलकंठ गोरे, किशोर चौधरी, अक्षय सोये, विनोद सुरडकर, विक्रम घोरपडे व कुलदीप यांची खास टिम बनवून मंगला एक्सप्रेस पनवेलला आल्यावर तपासायला सुरुवात केली. या वेळी स्लीपर कोचमध्ये वरती झोपलेल्या एका आरोपीला ओळखण्यात यश आले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेल्या दुसर्या दोन आरोपींना पकडण्यात आले. या वेळी त्यांच्याकडून 28 वेगवेगळ्या कंपनीचे 17 लाख 27 हजार 632 रुपयांचे मोबाइल सापडले. मंजित सचिन वीजेन्द्र हुडडा (दिल्ली), सूरज शेर सिंह (दिल्ली) आणि विरेन्द्र आदि दुर्गा नेपाळी (दिल्ली) यांना अटक करून पनवेलला आणण्यात आले.तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी त्यांना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.