Breaking News

भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’

रांची : वृत्तसंस्था

टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करीत ‘व्हाइट वॉश’ दिला. तिसर्‍या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर, तर फॉलोऑननंतरचा डाव 133 धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारताने मालिका 3-0ने जिंकली.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसर्‍या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सलामीवीर डीन एल्गर चांगला खेळत असताना त्याला चेंडू लागल्याने तो 16 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू डे ब्रून याने आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत आजचा पराभव उद्यावर ढकलला, पण चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटांत खेळ संपला. डे ब्रून (30) आणि लुंगी एन्गीडी नदीमच्या सलग दोन चेंडूंवर बाद झाले. मोहम्मद शमीने तीन, उमेश यादव आणि शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन, तर रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

तुफान फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा सरस खेळ केला. तिन्ही सामन्यांत भारताची ही कामगिरी कायम राहिली. परिणामी तिसरा सामना जिंकून भारताने आफ्रिकेवर निर्भेळ वर्चस्व

गाजविले आहे.

-‘हिटमॅन’चा नवा विक्रम; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने दोन शतके आणि एक द्विशतक ठोकत 529 धावा केल्या. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 500हून अधिक धावा करणारा रोहित पाचवा फलंदाज ठरला. यामुळे तो दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसलाय.

-भारताकडून तीन सामन्यांच्या कसोटीत 500+ धावा

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण-503 वि. ऑस्ट्रेलिया (2001)

वीरेंद्र सेहवाग-544 वि. पाकिस्तान (2004-05)

सौरव गांगुली-534 वि. पाकिस्तान (2007-08)

विराट कोहली-610 वि. श्रीलंका (2017-18) रोहित शर्मा – 529 वि. दक्षिण आफ्रिका (2019)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply