लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाली आणि अवघ्या दोन तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाल्याची दारुण स्थिती दुपारपासूनच दिसू लागली. देशभरातील जनतेकरिता देशाची अस्मिता, देशाची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे निवडणुकीतील जनादेशातून निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे. इतके की, 2014 पेक्षाही भाजपची यंदाची कामगिरी अधिक चमकदार दिसत असून देश खंबीरपणे मोदींच्या पाठिशी उभा ठाकला आहे. द्वेषाचे राजकारण करणार्यांना जनतेने चपराक लगावली असून सर्वसामान्य भारतीयांसाठीचा श्वाश्वत विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आगळ्या कार्यपद्धतीनेच होऊ शकतो असा ठाम विश्वास जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास एकटा भाजप 302 जागांवर तर एनडीएचे उमेदवार 350 जागांवर आघाडीवर होते. याचवेळेस काँग्रेस पक्ष मात्र जेमतेम 50 जागा मिळवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र होते. अमेठीमध्ये राहुल गांधी यांनी पराभूत होणे हा काँग्रेस पक्षासाठी सगळ्यात मोठा धक्का असावा. केरळ आणि तामिळनाडू वगळता संपूर्ण देशात भाजपची कामगिरी दमदार म्हणावी अशीच ठरली आहे. महाराष्ट्रात तर महायुतीची कामगिरी इतकी नेत्रदीपक आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने संपूर्ण विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मतमोजणीतही सकाळपासूनच महायुतीने जोरदार आघाडी घेतली होती. दिवसाअखेरीस राज्यातली काँग्रेस पक्षाची दयनीय स्थिती लक्षात घेता राजकीय पंडितांनी ठोकळेबाज विश्लेषणातून बाहेर पडण्याची गरज ठळकपणे अधोरेखित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकालांदरम्यान जनतेचे आभार मानण्यासाठी जे निवेदन केले त्यात याचा उल्लेख केला. प्रचारादरम्यान राज्यभरातील लोकांना भेटताना आपल्याला ही ‘सायलेन्ट मोदी वेव्ह’ दिसत होती. परंतु राजकीय पंडित मानायला तयार नव्हते. देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदींच्या हातात देण्यासाठी लोक उत्सुक दिसत होते. त्यातूनच हा अभूतपूर्व विजय, अभूतपूर्व असा कौल भाजपला मिळाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. दिवसाअखेरीस राज्यात भाजप 23, शिवसेना 18 तर काँग्रेस फक्त 1, राष्ट्रवादी 5 आणि वंचित 1 असे चित्र दिसत होते. हे यश निश्चितपणे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे व भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या संघटन कौशल्याचे आहे. मोदी यांच्या ब्रॅण्डची जादू काय आहे, हे स्वीकारण्यास जे तयार नव्हते त्यांना या निवडणुकीतून चांगलेच उत्तर मिळाले आहे. देशभरातल्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी उत्साहाने भेटीगाठी घेणार्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसमचा आंध्र विधानसभेत सुफडा साफ झाला तर इकडे राज्यातही ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत सभांमधून गर्दी खेचणार्यांचा कुठलाही प्रभाव जनमानसावर पडलेला नाही, हे मतदानातून स्पष्ट झाले. सभांमधून त्यांनी विचारलेल्या कथित प्रश्नांना जनतेनेच आता चोख उत्तर दिले आहे, असे म्हणावे लागेल. ‘आपले शेत सोडून दुसर्यांच्या शेतात नांगरणी करायला जाऊ नका’, हा भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांना दिलेला सल्ला योग्य असाच आहे. राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघात पदार्पणातच पराभव झाला तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या कामगिरीत पश्चिम बंगालचा विशेष उल्लेख करावा लागेल. ममता बॅनर्जींच्या किल्ल्याला भगदाड पाडून भाजपने तिथेही 18 जागांवर आघाडी घेतलेली पहायला मिळाली. हा आकडा ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या 22 पेक्षा फारसा मागे नाही. निवडणुक निकालांनंतर विरोधी पक्षांना निश्चितपणे आत्मपरीक्षण करणे भाग पडणार आहे. विरोधी पक्षानी मोदींवर केलेला वैयक्तिक स्वरुपाचा हल्लाबोल त्यांच्यावरच उलटल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी तर सातत्याने मोदी यांनाच आपल्या भाषणांमध्ये लक्ष्य केले. राफेलसंदर्भात राहुल यांनी मोदींवर कितीही आरोप केले तरी जनतेच्या मनात मोदींची प्रतिमा भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ चारित्र्याच्या राजकीय नेत्याचीच आहे. मोदींची उत्तुंग कामगिरी आणि निष्कलंक चारित्र्य यांच्यामुळे विरोधकांच्या त्यांच्या विरोधातील टीकेमुळे जनतेच्या मनात विरोधकांबद्दल रागच निर्माण झाला. पाकिस्तानच्या विरोधात आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संदर्भात मोदींनी घेतलेली खंबीर भूमिका लोकांना सर्वाधिक भावली. यासंदर्भात मध्यमवर्गीयांसोबतच गरीब-श्रीमंत अशा सर्व वर्गांकडून त्यांना मोठा पाठिंबा लाभला. विरोधकांनी कितीही टीका केली तरी मोदींची ‘विकास घडवून आणणारा नेता’ ही ओळख जनतेच्या मनावर खोलवर कोरली गेली आहे. विकासात अडचणी, अडथळे येणारच. मोदींना आणखी एकदा संधी दिलीच पाहिजे याबद्दल जनता ठाम आहे. आणि त्यातूनच अवघा देश पुन्हा एकदा मोदींच्या पाठिशी उभा राहिला आहे. देशाच्या आघाडीवर पक्षाने अभूतपूर्व असे यश मिळवलेच आहे. आता पुढली लढाई विधानसभेसाठीची आहे. विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल यापेक्षा वेगळा नसेल याबद्दल पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले त्याप्रमाणे, लोकांनी दिलेला हा अभूतपूर्व कौल झोप उडवणारा आहे. लोक जेव्हा इतके प्रेम देतात तेव्हा आपली जबाबदारी आणखी वाढते. ही जबाबदारी जाणूनच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता पुन्हा कंबर कसायला हवी आहे.
Check Also
विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …