पनवेल : बातमीदार
प्रकाशाचे आणि मांगल्याचे प्रतीक असलेली दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्ताने बाजारात आकाश कंदील, रांगोळ्या, पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा चिनी साहित्य बाजारपेठेतून हद्दपार झाले असून, भारतीय बनावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात पाहायला मिळत आहेत. प्लास्टिकबंदीचा हा परिपाक असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत चायना आकाश कंदील अधिक प्रमाणात विक्रीसाठी येत होते. यंदा त्याचे प्रमाण तुरळक आहे. देशी बनावटीच्या आकाश कंदिलांना यंदा चांगली मागणी आहे. त्यातही कोल्हापुरी साज असलेले कंदील लक्ष वेधत आहेत. कापड, स्पंज, कागद, आइस्क्रीमच्या कांड्या व बांबूंपासून तयार केलेले पर्यावरणपूरक आकाश कंदील बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रंगीबेरंगी, मण्यांची सजावट केलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. रांगोळीमध्ये स्टिकर्सच्या रांगोळीला अधिक मागणी असते. लक्ष्मीपूजनाला घराच्या चौकटीवर शुभ लाभ, देवीची पावले चिटकवली जातात. त्यामध्ये पुठ्ठ्यापासून बनविलेले स्टिकर्स उपलब्ध आहेत. भेटवस्तूंमध्ये मेणाच्या सुगंधी पणत्यांना अधिक पसंती मिळत आहे. यामध्ये विजेवर चालणार्या पणत्या उपलब्ध आहेत. दिवाळीचे साहित्य संबंधित वस्तूंचा आकार आणि दर्जानुसार बाजारपेठेत उपलब्ध आहे. त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे चित्र दिसत आहे.