खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील हाळ बुद्रुक गावातील रियाज अब्दुल कादीर जळगावकर याला पोलिसांनी गोवंश हत्येप्रकरणी अटक केली आहे.
हाळ बुद्रुक गावात बेकायदा गुरांची कत्तल होत असल्याची माहिती खालापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हाळ बुद्रुक गावात छापा टाकला असता रियाज हा गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या करताना रंगेहाथ सापडला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कत्तलीसाठी लागणारे साहित्य जप्त केले.
रियाजविरोधात प्राणीसंरक्षण अधिनियम 1976चे कलम 5(क), 9(अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाजला खालापूर न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार राम पवार करीत आहेत. गोवंश हत्येचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.