कर्जत : बातमीदार
दिवाळी सणानिमित्ताने कोतवालवाडी ट्रस्टच्या महिला विकास केंद्राने फराळ आणि भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्रामधील बाजारपेठेचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त राम ब्रम्हांडे, सावळाराम जाधव, शेखर भडसावळे, स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे, महिला विकास केंद्राच्या अध्यक्ष संध्या देवस्थळे आदी उपस्थित होते. या दिवाळी साहित्य बाजारपेठेमध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि कापडी पिशव्या यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. शेतकरी महिलांनी आपल्या शेतात पिकविलेले रताळी आणि कंदमुळे यांची विक्रीदेखील सुरू करण्यात आली आहे, तसेच सुगरणीने बनविलेले चटकदार आणि चमचमीत खाद्यपदार्थांची विक्रीही सुरू आहे. त्याच वेळी महिला विकास केंद्रातील प्रशिक्षणार्थींनी आनंद मेळावा आयोजित केला आहे. कर्जत येथील स्वामिनी ज्येष्ठ नागरिक संघ आणि नेरळ महिला मंडळाच्या सदस्यांनी या बाजारपेठेमध्ये उत्स्फूर्तपणे हजेरी लावून येथील वस्तूंची खरेदी केली.