नवी मुंबई : प्रतिनिधी
तळोजा वसाहत सेक्टर 9 मध्ये सिडको 60 लाख रुपये खर्च करून उद्यान विकसित करणार असून, वसाहतीमधील हे पहिले उद्यान आहे. एप्रिल अखेरपर्यंत उद्यानाचे काम करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
सिडकोने तळोजा वसाहत विकसित करताना फेज 1 आणि 2 असे वर्गीकरण केले आहे. फेज 1 प्रथम विकसित झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्य करीत आहेत, परंतु अद्यापही परिसरात उद्यान आणि मैदान विकसित करण्यात आले नाही. फेज 1 मध्ये सिडकोने सेक्टर 2, 10 आणि 11 मध्ये मैदान, तर सेक्टर 9 मध्ये उद्यानासाठी भूखंड राखीव ठेवले आहेत. वसाहतीमध्ये 7410 चौरस मीटर भूखंडावर विकसित करण्यात येणारे हे एकमेव उद्यान आहे. सेक्टर 9 मधील प्लॉट 6 मध्ये 60 लाख रुपये खर्च करून उद्यान विकसित केले जाणार आहे. या उद्यानात मुलांना खेळण्यासाठी खेळणी असणार आहेत, तसेच बॅडमिंटन कोर्ट, नागरिकांना सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी पदपथ असणार आहे. या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम करता यावा यासाठी उद्यानात एका बाजूला 9 बाय 9 मीटरचा अॅम्पिथिएटर उभारले जाणार आहे. या शिवाय उद्यानाच्या चोहोबाजूने आसन व्यवस्था आणि झाडे लावण्यात येणार आहेत. ठेकेदारांना कामाची परवानागी देण्यात आली असून, येत्या एप्रिल किंवा मे पूर्वी हे काम करून उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. वसाहतीमधील नागरिकांना हक्काचे उद्यान मिळणार असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
ठेकेदारांना कामाची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. लवकरच काम सुरू करण्यात येणार असून, एप्रिल-मे महिन्यापूर्वी उद्यानाचे काम पूर्ण काम करून उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
-मिलिंद म्हात्रे,
कार्यकारी अभियंता सिडको
तळोजा वसाहतीत एकही उद्यान नसल्यामुळे मुलांना घेऊन खारघरमधील उद्यानात जावे लागते. सिडकोने उद्यानाचे काम वेळेत पूर्ण करून नागरिकांसाठी उद्यान खुले करावे.
-अशोक श्रीवास्तव, रहिवासी तळोजा