राज्य शासनाचे दुर्लक्ष; पुनर्बांधणीसाठी अभाविपची स्वाक्षरी मोहीम
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पनवेल या शैक्षणिक संस्थेची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. या बाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन संबंधित खात्याला अभाविपकडून देण्यात आले आहे.
पनवेल हे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेले शहर आहे. येथील शासकीय योजनांच्या सुविधा देताना त्या सुसज्ज व चांगल्या असाव्यात. राज्य शासनाच्या अखत्यारित असणारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. परंतु महाविद्यालयाची इमारत धोकादायक झालेली आहे. महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपांची वाढ झालेली आहे. यामध्ये साप, विंचू अशी धोकादायक प्राणी निघण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. गेली दोन वर्षे या शैक्षणिक संस्थेचा दुरुस्तीचा प्रस्ताव येत आहे, पण यामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. 2015 साली पनवेल नगरपरिषदेने वसतिगृह व प्रशासकीय इमारत धोकादायक ठरवली असून इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील याच इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्यात येत आहे. ही विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. याच इमारतीवर प्लास्टिक आवरण टाकून तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक सेवा निधीमधून जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांना आधार दिला जात आहे.
या विषयाच्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेलच्या वतीने या महाविद्यालमधील विद्यार्थ्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली व या स्वाक्षर्यांचे निवेदन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय कार्यालयात देण्यात आले. या वेळी कोकण प्रांत सहमंत्री साधना यादव, मयुर साबळे, श्रेयस मांडगे, निरंजन आंबवणे, देवेंद्र चिंचाळकर व हर्षल शिरसाठ हे कार्यकर्ते उपस्थित होते.