कर्जत : बातमीदार
देश पारतंत्र्यात असताना कर्जत तालुक्यात क्रांतिकारक चळवळ उभी राहिली होती आणि त्यातील भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथील जंगलात हौतात्म्य प्राप्त झाले होते. ही पावनभूमी दिवाळीच्या मध्यरात्री हजारो दिव्यांनी प्रकाशमान करण्याचे काम कर्जत येथील क्रांतिकारक भगत मास्तर प्रतिष्ठानने केले. या उपक्रमात शेकडो तरुण सहभागी झाले होते.
कर्जत तालुक्यातील तरुणांनी भाई कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी चळवळ उभी केली. त्यातून 1942 मध्ये उभ्या राहिलेल्या या लढ्यातील दोन तरुणांना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे असलेल्या मुक्कामात वीरमरण प्राप्त झाले होते. तो इतिहास मुरबाड स्मारक समितीने जिवंत ठेवला असून या भूमीत कर्जत येथील क्रांतिकारक भगत मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी सण साजरा केला जातो. दोन्ही हुतात्म्यांना ज्या जागेवर हौतात्म्य प्राप्त झाले, त्या ठिकाणी उभारण्यात आलेला शहीद स्तंभ येथे दिव्यांची रोषणाई करण्यासाठी शेकडो तरुण पोहचत असतात. स्वातंत्रसैनिक भगत मास्तर यांचे सुपुत्र भरत भगत यांनी ही परंपरा सुरू केली असून, या वर्षी मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक खाटेघरे, मुरबाड स्मारक समितीचे सदस्य महेश पवार यांच्यासह तरुण मोठ्या संंख्येने उपस्थित होते.
भगत मास्तर प्रतिष्ठानचे तरुण दोन दिवस आधी सिद्धगड येथे पोहचले होते. त्यांनी तेथे जाऊन शहीद स्तंभ आणि समाधी परिसर स्वच्छ करून घेतला. दिवाळीच्या रात्री 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत हजारो दिवे लावून, त्यांनी सिद्धगड परिसर उजळवून टाकला. या तरुणांनी ‘व्यर्थ न हो बलिदान’आणि वंदे मातरम ही नावे दिव्यांनी साकारली होती. विलास कोळंबे, शिवराम बदे, धनेश राणे, महेश शिंगटे, भूषण आगीवले, परेश भगत, जितू भगत, संतोष पेमारे, गणेश राणे, विनय शिंगटे, राजेश हाबळे, विकास हाबळे, जगदीश आगीवले, मनोज कोंडीलकर, विलास शिंगटे, रमेश गवळी, नितीन म्हसे, मनोज हाबळे, अनंता गवळी, मिलिंद विरले, विजय झांजे यांनी उपक्रमात भाग घेतला होता.