चौकशी करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील करदाता नागरिक आज असुरक्षित झाला आहे. इथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून रक्षकच भक्षक बनला आहे. इथे अनधिकृत धंद्यांमुळे अधिकार्यांना मोठे लक्ष्मीदर्शन होत असल्याने वर्षानुवर्षे नवी मुंबईत काही अधिकारी ठाण मांडून आहेत. अशा अधिकार्यांच्या मालमतेची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये केली आहे.
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नवी मुंबईकरांच्या सुरक्षितता या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना पुन्हा एकदा जोरदार वाचा फोडली आहे. यापूर्वीदेखील बेलापूर येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईत मागील अडीज वर्षात बोकाळलेल्या अवैध धंद्यावर तोफ डागली होती.
चालू विधिमंडळ अधिवेशनामध्ये शहरातील वाढत्या घरफोड्या, चार्या तसेच अवेध धंदे यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या विषयांचे पत्र दिले असून फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेऊन पुढील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती याची आठवण सभागृहात आमदार मंदा म्हात्रे करून दिली.
नवी मुंबईत सिडको तसेच खासगी विकासकांनी अनेक गृहप्रकल्प उभारले. यामध्ये शांततेत राहणार्या नागरिकांना मागील अडीच वर्षांत विविध त्रासाला तोंड द्यावे लागत असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
नवी मुंबईत कोट्यवधी रुपयांची घरे घेऊन राहणार्या नागरिकांची सुरक्षा आज वार्यावर आहे शहरात सुमारे पाच हजार घातक रासायनिक द्रव्याने भरलेले टँकर वाहतूक अधिकार्यांच्या आशीर्वादाने उभे असल्याचा आरोप या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. करदात्या नवी मुंबईकरांच्या जीवितहानीची वाट हे अधिकारी पाहत आहेत का? चोरट्या मार्गाने गोमांस चोरी, बेकायदा गुटखा विक्री, डिझेल चोरी, सोन्याच्या दागिन्यांची लूटमार, घरफोडी असे गुन्हे मागील अडीज वर्षात बेमालूम सुरू होते, असा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे केला.
वाहतुक अधिकारी तसेच अन्य अधिकारी वर्षानुवर्षे नवी मुंबईत कसे ठाण मांडून आहेत? याची चौकशी करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. या लक्षवेधी वर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नवी मुंबईतील विविध अधिकार्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.