Breaking News

मृत घोषित केलेल्या व्यक्तीला पत्रकार जीवन पाटील यांनी दिले जीवदान

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथील पत्रकार जीवन पाटील यांनी नुकतेच अलिबाग-पेण रस्त्यालगतच्या जेएसडब्ल्यू कंपनी जवळील कासुमाता मंदिरालगतच्या असणार्‍या खड्ड्यामध्ये रात्रभर नग्न अवस्थेत पडून राहिलेल्या इसमाला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. हा इसम रात्रभर चिखलाने भरलेल्या खड्ड्यात पडून राहिला होता. त्याला उठता न आल्याने तो बाहेर येऊ शकत नव्हता. त्याच अवस्थेत तो रात्रभर चिखलात पडून होता. पहाटे रस्त्याने जाणार्‍या लोकांनी इसमाला पाहिले, परंतु तो मृत आहे असे समजून कोणीही त्याच्याजवळ गेला नाही. पहाणार्‍या गर्दीतल्या एकाने मृत प्रेतांना बाहेर काढून आपल्या रुग्णवाहिकेमधून त्यांना पोलीस व घरच्यांपर्यंत पोहचविण्याची विनामूल्य सेवा करणार्‍या भाकरवडचे पत्रकार व मनस्वी मानव सामाजिक संस्थेचे संस्थापक जीवन पाटील यांना कॉल केला व सदरील घटनेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता पत्रकार घटनेच्या ठिकाणी पोहोचले असता त्यांनी जवळ जाऊन पाहिले, तर इसम जिवंत होता. त्यांनी त्याला बाहेर काढून इतरांच्या मदतीने अंघोळ घातली व त्याला कपडे घातले. त्यानंतर त्याला नाष्टा दिला. हा इसम घाबरलेल्या अवस्थेत असल्याकारणाने त्याला धीर देत त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुधीर लक्ष्मण ठाकूर, थेरोंडा, आग्र्याचीवाडी येथील राहणारा असल्याचे सांगितले. सदरील घटना ही वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने घटनेची माहिती त्वरित वडखळ पोलीस ठाण्याला दिली. तसेच सध्या जेएसडब्ल्यू कंपनीत कामाला असणारे रिटायर पीएसआय पोटे साहेब यांच्या मदतीने जेएसडब्ल्यूच्या प्रशासन व्यवस्थेकडून लगेचच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. इसम हा रेवदंडा पोलीस ठाण्यातील हद्दीतील असल्याकारणाने घटनेची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्यातील पीएसआय हर्षद हेंगे यांना दूरध्वनीवरून दिली असता त्यांनी त्वरित दोन पोलीस कर्मचारी सोबत पाठवून दिले. त्यानंतर जेएसडब्ल्यूचे कामगार, ड्रायव्हर, पोलीस कर्मचारी इ. सोबत जीवन पाटील यांनी सदरील इसमाला त्याच्या घरी नेले असता त्यांना पहाताच दोन दिवसापासून आपला भाऊ, मुलगा हरवला असल्याने चिंतेत असणार्‍या घरच्यांना आनंद झाला. त्या वेळी आपला मुलगा बुद्धीने कमी व विसराळू असल्याने कुठे गेला असेल म्हणून आम्ही त्याला गेली दोन दिवस शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जीवन पाटील यांनी घडलेली घटना सांगताच कुटुंबातील सर्वांचेच मन भरून आले व त्यांनी आपला भाऊ व मुलगा सुखरूप घरी पोहोचविल्याबद्दल सर्वांचेच आभार मानले. पत्रकार जीवन पाटील यांनी आतापर्यंत 85 मृतप्रेत बाहेर काढून त्यांना स्वतःच्या रुग्णवाहिकेमधून कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले असून, 64हून अधिक अपघातग्रस्त लोकांना त्वरित दवाखान्यात पोहोचवून जीवदान दिले आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply