अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील मौजे खंडाळा, रामराज, पेण तालुक्यातील वाशी खारेपाट व हमरापूर विभाग, पनवेल तालुक्यातील तारा या गावातील अतीवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भात पिकाच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शेतकर्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, पेणचे आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी अलिबागचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, तहसीलदार सचिन शेजाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरमध्ये अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकर्याची समस्या ऐकून घ्यावी. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मोबदला देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी दिल्या.