Breaking News

शेतकर्यांना शंभर टक्के भरपाई द्या

आमदार महेंद्र थोरवे यांची सूचना; नुकसानीची केली पाहणी

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील भातशेती आणि अन्य प्रकारच्या शेतीचे झालेले नुकसान यांची नोंद शासनाने करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 100 टक्के भरपाई दिली पाहिजे, अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. तालुक्यातील मांडवणे, आंबोट भागातील नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केल्यानंतर तसे आदेश तहसीलदार यांना दिले.दरम्यान, नुकसानग्रस्त सर्व शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे 4 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केले जातील, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली आहे. कर्जत तालुक्यात सरत्या पावसाने भातशेतीचे तसेच, नाचणी, नागली आणि वरी या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व भागांत काही शेतकर्‍यांनी भाताचे पीक शेतात कापून ठेवले आहे, तर काही शेतकर्‍यांनी शेतात कापून ठेवलेल्या भाताच्या पिकाला नवीन कोंब फुटले आहेत. त्याच वेळी वादळी वार्‍याने बहुतेक सर्व ठिकाणी भाताचे पीक शेतात कोसळले असून ते पीक शेतात असलेल्या पाण्यामुळे भिजत आहे. त्याच वेळी तालुक्यातील अन्य भागात भाताचे पीक काळपट पडले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकारी वर्गासह तालुक्यातील काही गावातील शेतीची पाहणी केली. मांडावणे, आंबोट भागातील शेतीची पाहणी करीत असताना तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांचा सहभाग होता. त्याशिवाय शिवसेनेचे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तसेच सेना-भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. मांडवणे गावातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती आमदार थोरवे आणि शासकीय अधिकारी यांना स्थानिक शेतकरी योगेश दाभाडे यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी शेतकर्‍यांना धीर देत तालुक्याचे तहसीलदार देशमुख यांना तालुक्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे हे वस्तुनिष्ठ झाले पाहिजेत आणि त्या नुकसान झालेल्या शेवटच्या शेतकर्‍याला शासनाची मदत मिळाली पाहिजे. पंचनामे करताना कोणत्याही प्रकारचे राजकारण होणार नाही यांची काळजी घेण्याची सूचना देतानाच आपल्याला नंतर कोणत्याही शेतकर्‍याच्या तक्रारी येणार नाहीत अशी सूचना थोरवे यांनी केली. त्या वेळी माहिती देताना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तालुक्यातील सर्व तलाठी, कृषी विभागाचे कृषी सहायक आणि पर्यवेक्षक, तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना पंचनामे करायला पाठवले असून 4 नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील सर्व 10 हजार हेक्टर शेतीचे पंचनामे करून झालेले असतील असे सांगितले. त्याच वेळी सर्व शेतकर्‍यांना मिळणारी शासनाची मदत ही थेट त्यांच्या बँक अकाऊंटवर पोहच होणार आहे, असेदेखील स्पष्ट केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply