लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 40 लाखांची मदत जाहीर
उरण ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीचा कार्यक्रम रविवारी (दि. 29) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्युनिअर कॉलेजसाठी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले.
या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य भावना घाणेकर, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज गुंड, श्री. पाटील, श्री. पोफळे, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, विद्यालयाचे प्राचार्य एम.जी. म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू यांनी विद्यालयाच्या विकासात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे असलेले योगदान सांगत ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीसाठी त्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली. अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नूतन इमारतीसाठी 40 लाख रुपये देणगी जाहीर केली. त्याबद्दल संपूर्ण विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य एम.जी. म्हात्रे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सादर केला तसेच विद्यालयासाठी सामाजिक योगदान आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मिळालेल्या देणगीसाठी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले तसेच दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, एनएमएमएस परीक्षेत तसेच इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरवदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.