Breaking News

समुद्र खवळला; ‘महा’चक्रीवादळाचा धोका!

मच्छीमारांना परत येण्याचे आवाहन

मुंबई ः प्रतिनिधी

अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबरपर्यंत) मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने परत यावे, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे बुधवार (दि. 6) ते शुक्रवारदरम्यान (दि. 8) नाशिक जिल्ह्यात काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकरी बांधवांनी शेतमाल सुरक्षितस्थळी ठेवावा किंवा सुरक्षित साठवणूक करावी. जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे शेतमाल खराब होणार नाही. शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी. वादळामुळे शेड, पत्रे, कमकुवत घरे, झाडे, गुरांचे गोठे, पशुपालन शेड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. शाळांचे, घरांचे पत्रे, कांदा चाळ पत्रे वार्‍यामुळे उडू शकतात. त्यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठी संबंधितांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. अतिवृष्टीमुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग तत्काळ करावा लागेल. त्याकरिता नदीकाठच्या सर्व नागरिकांनी यादरम्यान सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. अतिवृष्टीमुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply