मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटनेत 24 जखमी, 13 गंभीर
खालापूर, खापोली ः प्रतिनिधी
पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फूट दरीत कोसळली. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 13 प्रवासी गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
खोपोली पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड-मुंबई ही खासगी बस मुंबईला जात असताना बस खंडाळा घाटात गारमाळ पॉइंट रस्त्याच्या बाजूला आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अतिवेगाने नाल्यात कोसळली. ही घटना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास प्रवासी साखरझोपेत असताना घडली. त्यामुळे खंडाळा घाट किंकाळ्यांनी हादरला.
बसमधील प्रवासी सचिन थोरात (कराड) यांनी अपघाताची खबर खोपोली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांसह देवदूत व सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीसाठी खंडाळा घाटात धाव घेतली व जखमींना उपचारासाठी खोपोली नगर परिषद रुग्णालय, पवना हॉस्पिटल पुणे, तसेच लोकमान्य हॉस्पिटल पुणे, एमजीएम कामोठे, पनवेल या ठिकाणी हलविण्यात आले.
अपघातात सर्वज्ञ सचिन थोरात (3, रा. शिरवडे, ता. कराड, जि. सातारा), स्नेहा जनार्दन पाटील (15, रा. पारथेवाडी, घाटकोपर-मुंबई), संजय शिवाजी राक्षे (50, रा. पवई -मुंबई), प्रमिला रामचंद्र मोहिते (50, रा. बेलावले बु. ता. कराड, जि. सातारा), जनार्दन रामचंद्र पाटील (42, रा. पारथेवाडी, घाटकोपर-मुंबई) या प्रवाशांचा अपघातस्थळी जागीच मृत्यू झाला.
बाजीराव शेवाळे (40, वाशी), संजय पाटील (41, वाशी), वंदना शिंदे (35, कराड), जयेश पाटील (38, शिराळा) ओंकार शिंदे (18, कराड), उज्ज्वला निकम (11, कराड), दीपक यादव (43, कांजूरमार्ग-मुंबई), प्राजक्ता थोरात (27, कराड) या प्रवाशांना खोपोली नगर परिषद रुग्णालयात आणण्यात आले. पुढील उपचारासाठी कामोठे एमजीएम येथे पाठविण्यात आले. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. ही बस जुनी होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.