Breaking News

लाच देऊ नका आणि घेऊ नका, उपअधीक्षक अधिकराव पोळ यांचे आवाहन

मुरूड : प्रतिनिधी

शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचार्‍यांना शासनाकडून पगार दिला जातो. त्यामुळे जनतेची कामे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, मात्र ते काम पूर्ण करण्यासाठी ते अतिरिक्त रक्कम स्वीकारत असतात. अशा पद्धतीला आळा बसण्यासाठी लाचलुचपत विभागाची उभारणी करण्यात आली असून, लोकांनी या विभागाकडे तक्रार नोंदवावी व लाच पद्धतीला कायमस्वरूपी  प्रतिबंध आणावा, असे  प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अधिकराव पोळ यांनी मुरूडमध्ये केले.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने मुरूडमधील अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अधिकराव पोळ बोलत होते. लाच मागणार्‍यांच्या विरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

कोणी लाच मागत असेल, तर त्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवा, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तक्रारीची तपासणी करूनच त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते. कितीही मोठा अधिकारी असला, तरी त्याच्यावर कारवाई होते, अशी माहिती पोळ यांनी दिली.

कोणीच लाच देऊ नये आणि घेऊ नये. तो कायद्याने गुन्हा आहे. एकदा तुमच्यावर गुन्हा नोंद झाला, तर तुमची प्रतिमा मलिन होते, असे मत या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी व्यक्त केले. मुरूडचे उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ, सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन मनोहर मकू, रहिम कबले, समीर दवनाक यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply