यंदा संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. कोकणात तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी 3142.64 मिमी आहे. यंदा 5173.59 मिमी पाऊस पडला. वार्षिक पर्जन्यमानाच्या 164.63 टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात 1305.31 मिमी पाऊस पडला. मागील 20 वर्षात रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढा पाऊस पडला आहे. या पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. ही या पावसाची नकारात्मक बाजू आहे, परंतु या अतिपावसाची सकारात्मक देखील बाजू विचारात घेऊन आता नियोजन करावे लागेल. अतिपावसामुळे जमिनीत ओलावा राहील त्याचा फायादा रब्बी हंगामासाठी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणीसाठा वाढणार आहे. भूजलपातळी वाढेल. भरपूर पाऊस पडून देखील पाणीटंचाई भासते. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च होतात. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी करता येईल. त्यासाठी आतापासूनच कामाला लागावे लागेल.
कोकणात तीव्र उतारामुळे सिमेंटचे बंधारे फुटतात. समतल चर पाडल्यास पाणी झरपते, परंतु पाणी सतत झिरपून भविष्यात माती सैल होऊन तेथील दरड कोसळण्याचा धोका संभवतो. यावर उपाय म्हणून झिंक टाकीचा पर्याय पुढे आला आहे. या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी थेट जमा होते. त्यात एक फुगा बसविण्यात आलेला आहे. टाकी पूर्ण क्षमतेनी भरली की हा फुगा फुगतो आणि टाकीचे झाकण बंद होते. त्यामुळे सूर्यकिरण पाण्यापर्यंत पोहचत नाहीत. गावातील लोकसंख्येच्या आधारावर तीन महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकेल इतके पाणी साठविण्याची क्षमता असेल एवढी टाकी तयार केली जाते. यात जल शुद्धीकरणाची व्यवस्था असते. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. या टाकीमुळे मार्च ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जागतिक बँकेच्या मदतीने जल स्वराज्य योजनेतून झिंक टाक्या बसवण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात 52 झिंक टाक्या बसविण्यात येणार आहेत. यातील काही ठिकाणी झिंक टाक्या बसविण्याचे कामही सुरू झाले आहे.
कोकणात खडकाळ जमीन आहे. ती पाणी शोषून घेत नाही. त्यामुळे पुनर्भरण होत नाही. तीव्र उतार असल्यामुळे सिमेंटचे बंधारे पण टिकत नाहीत. त्यामुळे कोकणातील पाणीटंचाईवर झिंक टाक्यांचा पर्याय उत्तम ठरत आहेत. कोकणात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता झिंक टाक्याचा पर्याय पुढे आला आहे. रायगड जिल्ह्यात जलस्वराज्य अभियान टप्पा दोन आंतर्गत गेल्या वर्षी 28 झिंक टाक्यांची उभारणी करण्यात आली होती. या वर्षी आणखी 52 गावांमध्ये झिंक टाक्या उभारल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात 28 झिंक टाक्या उभारण्यात आल्या होत्या. याचे सकारात्मक परिणाम यंदा पाहायला मिळतील. महाड, पोलादपूर, कर्जत आणि रोहा तालुक्यात उभारण्यात आलेल्या 28 टाक्यांमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली नाही. या टाक्यामधील पाणीसाठ्यामुळे टँकर लावण्याचीही वेळ आली नाही. त्यामुळे दुसर्या टप्प्यात 52 झिंक टाक्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या टाक्या बसवल्यानंतर मार्च ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीतील या 52 गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला, असे म्हटले जात आहे. ही एक चांगली योजना आहे. असे असले तरी ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते त्या सर्वच गावांमध्ये एकाच वेळी या झिंक टक्या बसविता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे जेथे शक्य आहेत तेथे छोट-छोटे वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम मोठ्या प्रमणावर करणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या 21 पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त आहेत. त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या गावांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यातील काही योजना दुरुस्त करता येण्यासारख्या आहेत. असे असूनही त्या दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यापैकी अनेक पाणीपुरवठा योजना नादुरुस्त आहेत. त्या दुरुस्त कराव्या लागतील. भरपूर पाऊस पडूनदेखील पाणीटंचाई भासते. जानेवारी महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई सुरू होते. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च होतात. यंदा पडलेल्या अतिपावसाच्या पाण्याचा उपयोग करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करता येईल. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून तलावांमधील गाळ काढण्यात येत आहे. मागील वर्षी जलयुक्त शिवाराची कामे झाल्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. 10 गावे टंचाईमुक्त झाली आहेत. यंदा तर जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे भूजलाची पातळी वाढणार हे निश्चित आहे. तरीदेखील पाण्याचे नियोजन करावेच लागणार आहे. अतिपावसाच्या पाण्याचा उपयोग पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कसा करता येईल यावर प्रशासानातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विचार करून काम केले पाहिजे.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात