दिवसरात्र रस्तोरस्ती उभे राहून कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या पोलीस दलातील कर्मचार्यांच्या अनेक अडचणी आणि व्यथा आहेत. तुटपुंजे वेतन, सुट्यांचा पत्ता नाही, कामाच्या बेभरवशाच्या वेळांमुळे होणारी खाण्यापिण्याची, आरोग्याची आबाळ या सार्या परिस्थितीशी देशभरातील पोलीस अनेक वर्षे झगडत आले आहेत. यातूनच देशातील अनेक भागांत पोलिसांमध्ये कमालीची बेपर्वाई, असंवेदनशीलता तसेच अकार्यक्षमताही दिसून येते.
जनसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी अहोरात्र वाहणारे पोलीस अकस्मातपणे राजधानी दिल्लीत आंदोलकांच्या रूपात जगासमोर आले आहेत. क्षुल्लकशा कारणावरून पेटलेला पोलीस आणि वकील संघर्ष खरे तर देशभरातील पोलिसांच्या मनात अनेक वर्षे धगधगणार्या असंतोषाची चुणूक दाखवतो आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. दिल्लीत तीस हजारी न्यायालयात शनिवारी एका वकिलाने पोलिसांच्या गाडीसमोर दुचाकी उभी केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि पोलिसांनी संबंधित वकीलाला ताब्यात घेतले. या वकीलाच्या बाजूने लागलीच अन्य वकील उभे राहिले. यातून दोन्ही गटांत हिंसक संघर्ष पेटला. यात पोलिसांची एक गाडी जाळण्यात आली. शनिवारच्या या घटनेनंतर सोमवारी आणखी एका पोलीस अधिकार्याला वकिलांनी मारहाण केल्यावर मात्र पोलिस-वकील संघर्षाला गंभीर वळण लागले. वरिष्ठ अधिकार्यांनी अनेक वेळा समजूत काढल्यानंतर तब्बल 11 तासांनी पोलिसांनी मंगळवारचे आपले आंदोलन मागे घेतले. जमावाकडून होणार्या मारहाणीच्या विरोधात सगळेच घटक संरक्षण मागत असतात. आणि त्या-त्या वेळी या घटकांना पोलिसांचे संरक्षण पुरवले जाते. परंतु आता संरक्षण देणारे पोलीस स्वत:च आम्हाला कोण संरक्षण देणार असा सवाल करीत आहेत. आम्हाला मानवाधिकार नाही का, अशी विचारणा पोलिसांनी केली आहे? पोलिसांना संघटित होण्याचा अधिकार नाही. देशात कायदा व सुव्यवस्था राखली जाण्याच्या मार्गात कदापिही अडथळा येऊ नये या हेतूने पोलिसांना हा अधिकार नाकारण्यात आला आहे. परंतु आता दिल्लीतील या घटनेच्या निमित्ताने ‘पोलीस कल्याण धर्मादाय संस्था’ स्थापन करण्याची तसेच पोलीस संरक्षण कायदा करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. तीस हजारी न्यायालयातील घटनेत सहभाग असलेल्या वकिलांवर कारवाई करण्याची मागणी करीत पोलिसांनी आंदोलन लावून धरले. या वेळी आंदोलनकर्त्या पोलिसांसमोर आयुक्तांपासून सर्वच वरिष्ठ अधिकारी हतबल झालेले दिसून आले. दिल्ली पोलीस मुख्यालयासमोर गणवेशातच या पोलिसांनी ठिय्या धरला होता. ’वी वाँट जस्टिस’, ‘हमारा सीपी कैसा हो, किरण बेदी जैसा हो’ अशा घोषणा या वेळी पोलीस देत होते. महाराष्ट्रातील व विशेषत: मुंबईतील पोलीस मात्र अशाच सार्या परिस्थितीतही निश्चितच कमालीच्या शिस्तीने व कार्यक्षमतेने काम करताना आढळतात. आपल्या अडचणींकडे, कामाच्या वाईट स्थितीकडे कुणाचेच लक्ष नाही ही भावना अधूनमधून पोलिसांमध्ये बळावत असतेच. त्यातच वरिष्ठ अधिकारी व पोलीस शिपाई यांच्यातला सुसंवादही अभावानेच आढळतो. दिल्लीतील पोलीस हे केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येतात. पोलीस संघटना स्थापन करण्याची मागणी या पोलिसांनी लावून धरल्याने अर्थातच गृहमंत्रालयासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. हे लोण देशभरात पसरल्यास कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका संभवतो. त्यामुळे वेळीच हालचाल करून हा संघर्ष थोपवणेच योग्य ठरेल.