पनवेल : बातमीदार
सामाजिक विषय घेऊन मागील चार वर्षांपासून कामोठ्यातील अट्रास्टिक फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदा ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश घेऊन कामोठ्यात मॅरेथॉन होणार आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून वेगवेगळ्या गटांत 3, 5 आणि 10 किलोमीटर अंतरासाठी दौड लगावली जाणार आहे.
पनवेल महापालिका, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रायगड जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांनी एकत्रितपणे या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन अट्रास्टिक फाऊंडेशनचे
अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता कामोठ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सेक्टर 6 येथील शाळेच्या पटांगणातून मॅरेथॉनला सुरुवात होईल. विजेत्यांना रोख रक्कम, पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, टी-शर्ट बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी नीरव नांदोला (98335 08282) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.